सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर,महाराष्ट्रातील 88 हजार 523 विद्यार्थी उत्तीर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकालही जाहीर केला असून महाराष्ट्रातील 88 हजार 523 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातून एकूण 90 हजार 868 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून राज्याचा निकाल 97.42 टक्के इतका आहे. सीबीएसई बोर्डाचा एकूण निकाल 94.40 टक्के इतका लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घटला आहे, तर एकूण 47 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

सीबीएसई दहावीच्या परीक्षेला देशभरातील 22 हजार 731 शाळांतील 20 लाख 93 हजार 978 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 19 लाख 76 हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 1 लाख 17 हजार 310 विद्यार्थी नापास झाले आहेत. या परीक्षेत जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा (जेएनव्ही) निकाल सर्वाधिक लागला असला तरी सरकारी आणि अनुदानित शाळा मात्र तळाला गेल्या आहेत. त्यातही अनुदानित शाळांचा निकाल हा निराशाजनक राहिला असून केवळ 76.73 टक्के इतका निकाल लागला आहे. तर खासगी शाळांनी मात्र बारावीच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावली आहे.

दहावीची परीक्षा ही मंडळाकडून दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती. याचा एकत्रित निकाल मंडळाने जाहीर केला आहे. यावेळीही त्रिवेंद्रम विभागाचा सर्वाधिक असा 99.68 टक्के आहे. सर्वात कमी निकाल हा गुवाहाटी विभागाचा 82.23 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत 2 लाख 36 हजार 993 विद्यार्थ्यांनी 90 टक्केहून अधिक, तर 95 टक्केहून अधिक गुण 64 हजार 908 विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे 1.41 टक्केहून अधिक आहे. यावेळी 95.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 93.80 टक्के मुले उत्तीर्ण झाले असून ट्रान्सजेंडरचा निकाल 90 टक्के आहे.

n महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयांतील परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर खासगी शाळांतील 79 हजार 272 विद्यार्थ्यांपैकी 77 हजार 504 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश फेऱयांचे वेळापत्रक सोमवारी

सीबीएसई दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्याने रखडलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेने आता वेग घेतला आहे. ऑनलाइन अर्जाचा भाग 2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना खुला करून दिल्यानंतर आता सोमवारी प्रवेश फेऱयांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली. सीबीएसई वगळता इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भाग 2 याआधीपासूनच भरता येत होता. आता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज पसंतीक्रम देण्यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून पाच दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येणार आहे.