प्रयोगशील बासरीवादक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रख्यात बासरीवादक दिवंगत पंडित पन्नालाल घोष (पन्नाबाबू) यांचा रविवार, 24 जुलै रोजी 111 वा जन्मदिवस. पंडित घोष यांनी बासरीला सतार, सरोद, वीणा आदी वाद्यांच्या बरोबरीने प्रतिष्ठा व उंची प्राप्त करून दिली. साधारणपणे कुठल्याही संगीतवाद्याच्या अशा उत्क्रांतीत शेकडो वर्षे जातात. परंतु पन्नाबाबूंनी त्यांचे अतुलनीय कार्य केवळ  25 वर्षांच्या सांगीतिक जीवनात पूर्ण केले.

पंडित पन्नालाल घोष यांचा जन्म 24 जुलै 1911 रोजी बरिसाल येथे झाला. 1920 च्या दशकाच्या उत्तरार्धात ते कोलकाता येथे स्थलांतरित झाले. 1940 साली मुंबईला आल्यावर त्यांची बासरीवादक म्हणून कारकीर्द बहरास आली. पन्नालाल यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वाजवण्यासाठी अथक संशोधनातून बांबूच्या नवीन आणि परिपूर्ण बासरी तयार केल्या. सहा तारांचा तंबोरा पहिल्यांदा बनवला. तसेच अनेक नवीन राग आणि वाद्यवृंद रचनांची अनमोल भर घातली. शिस्तबद्धता तसेच स्वर, लय आणि ताल याबाबतीतली परिपूर्णता ही त्यांच्या बासरीवादनाची मुख्य वैशिष्टय़े. घोष यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, सिनेसंगीत असे सर्वच संगीतप्रकार अत्यंत लीलया सादर केले. गुरू म्हणून बासरीवादन शिकवण्यासाठी त्यांनी कधीही पैसे स्वीकारले नाहीत.

 पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत झालेल्या बासरीच्या या आश्चर्यकारक प्रगतीचे श्रेय तिच्या आधुनिक स्वरूपाचे जनक पन्नालाल घोष यांनाच निःसंशय जाते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक महान कलाकारांनी बासरीचा जगभर प्रसार करण्यात करण्यात मोठा हातभार लावला. 20 एप्रिल 1960 रोजी वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी त्यांचे दिल्लीत निधन झाले.