
चित्रकलेच्या साहित्य निर्मितीतील नामांकित कॅम्लिन समूहाच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख रजनी दांडेकर यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी लोणावळय़ातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रजनी दांडेकर यांच्या पश्चात त्यांचे पती सुभाष दांडेकर, मुलगा आशीष, मुलगी अनघा, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
चित्रकलेसाठीच्या रंग आणि साहित्याचा दांडेकर कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. 50 वर्षांपूर्वी रजनी दांडेकर यांनी कॅम्लिन व्यवसायात प्रवेश केला. हा व्यवसाय जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. देशविदेशात कॅम्लिनच्या साहित्याची प्रदर्शने भरविली. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आणि कॅम्लिनचे नाव आज जगभरात पोहोचले. रजनी दांडेकर यांनी कॅम्लिनला एका उंचीवर नेलेच, पण त्याचवेळी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी तसेच शिक्षक यांना प्रोत्साहन दिले.
2001 मध्ये कॅम्लिन फाऊंडेशनची स्थापना
सुभाष दांडेकर आणि रजनी दांडेकर यांनी 2001 मध्ये कॅम्लिन फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. मोठय़ा संख्येने महिला उद्योजिका निर्माण व्हाव्यात यासाठी रजनी दांडेकर सदैव प्रयत्नशील होत्या. त्यामुळेच मीनल दांडेकर यांच्या उद्योगिनी चळवळीला नेहमीच पाठिंबा दिला. रजनी दांडेकर या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्या जाण्याने उद्योग, कला, सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


























































