
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)च्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी दोन दिवसात राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरते निवारा केंद्र तयार करण्यात आले आहेत. 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 110 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 218 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.




























































