
>> दुष्यंत पाटील
निसर्गावर भरभरून प्रेम करणाऱया एडवर्ड मॅकडॉवल याने त्याच्या आयुष्यातला नंतरचा काळ त्याच्या फार्महाऊसवर व्यतित केला. तिथे अनेक संगीत रचना त्याला सुचल्या त्यातीलच एक म्हणजे टू अ वाइल्ड रोज. घराजवळच्या जंगली गुलाबांच्या फुलांची आठवण करून देणारं हे संगीत साधेपणातलं सौंदर्य दर्शवतें.
एडवर्ड मॅकडॉवल हा अमेरिकेतला 19व्या शतकाच्या शेवटच्या (आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या) काळातला एक महान संगीतकार होता. मॅकडॉवल हिवाळ्यात कॉलेजमध्ये संगीत शिकवायचा. दिवसाच्या ज्या वेळेत तो कॉलेजमध्ये शिकवत नसायचा तेव्हा तो वैयक्तिक शिकवण्या घेत लोकांना संगीत शिकवायचा. एकूणच त्याचा दिवसातला सारा वेळ शिकवण्यात जायचा. हिवाळ्यातलं त्याचं आयुष्य बऱयापैकी कष्टाचं असायचं, पण या धकाधकीच्या आयुष्यात त्याला ओढ असायची ती उन्हाळ्यातल्या आयुष्याची.
निसर्गाचं प्रेम हा त्याच्या आयुष्यातला एक खास कप्पा होता. 1896 मध्ये त्यानं एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यात एक छोटंसं फार्महाऊस, आजूबाजूच्या छोटय़ा छोटय़ा खोल्या, 15 एकर शेतीची जमीन आणि 50 एकर अरण्यक्षेत्र अशी ही प्रॉपर्टी होती. आजूबाजूच्या छोटय़ा खोल्या जोडत त्यानं तिथं एक मोठं घर बनवलं. अरण्य आणि डोंगर यांनी वेढलेलं हे फार्महाऊस त्याला प्रचंड आवडायचं. खरेदी केल्यापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रत्येक उन्हाळ्यात तो या फार्महाऊसमध्ये जाऊन आयुष्याची मजा लुटायचा !
अरण्याच्या मध्यभागी लाकडाच्या ओंडक्यांनी बांधलेलं एक छोटंसं घर होतं. आयुष्यातल्या नंतरच्या काळातलं बरंचसं संगीत मॅकडॉवलनं इथंच रचलं ! अरण्यात संगीत रचना करताना त्याची सर्जनशीलता बहरून यायची.
अरण्यातल्या घरात सकाळी नाश्ता करताना मॅकडॉवल सुचतील त्या संगीतातल्या कल्पना कागदावर लिहून ठेवायचा. या पूर्ण रचना नसायच्या, तर संगीतातले तुकडे असायचे. एखादं संगीत त्याला स्वतःला पसंत पडलं नाही तर तो संगीताचा तुकडा लिहिलेला कागद चुरगळून सरळ फायरप्लेसमध्ये (खोलीत ऊब राहावी म्हणून पेटवलेला अग्नी) टाकायचा !
1896 मध्ये अरण्यातल्या घरात आपली पहिलीच उन्हाळ्याची सुट्टी घालवताना एके दिवशी सकाळी नाश्ता करताना त्यानं काहीतरी संगीत रचना केली. या संगीतात त्यानं अमेरिकेतल्या मूळ रहिवासी असणाऱया रेड इंडियन लोकांच्या संगीतातून काही भाग घेतला होता. त्याला ती संगीत रचना पसंत पडली नाही. त्यानं तो कागद चुरगळून फायरप्लेसकडं भिरकावून दिला, पण त्याचा नेम चुकला ! मॅकडॉवल घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या पत्नीनं तो चुरगळलेला कागद उचलला आणि कागद उघडून पाहिलं. मग तिनं त्या कागदावर लिहिलेला संगीताचा तुकडा पियानोवर वाजवून पाहिला. तिला ते संगीत छान वाटलं.
तो परत घरी आल्यावर तिनं त्याला ते संगीत छान असल्याचं सांगितलं. त्या संगीताची चाल साधीच होती, पण तरीही ती खूप सुंदर आणि आकर्षक होती. त्यानं स्वतःच रचलेल्या त्या संगीताकडें एका नव्या दृष्टीनं पाहिलं. त्यालाही ते संगीत आवडलं. साधेपणा असूनही सुंदर असणाऱया संगीतानं त्याला अरण्यातल्या आपल्या लाकडी घराजवळची जंगली गुलाबाच्या फुलांची आठवण आली. त्यानं या संगीत रचनेला नाव दिलं ‘To a wild rose’.
ही संगीत रचना प्रचंड गाजली. आजही ही संगीत रचना खूप लोकप्रिय आहे. मूळ रचना पियानोसाठी लिहिली गेली, पण नंतरच्या काळात वेगवेगळ्या वाद्यांसाठी, वाद्यवृंदासाठी ही रचना अरेंज करण्यात आली. ‘Penny Serenade’ नावाच्या 1941च्या एका चित्रपटात ही रचना थीम म्युझिक म्हणून वापरण्यात आलं !
‘To a wild rose’ ही रचना त्यानं रचलेल्या एका अल्बमचा भाग आहे. या अल्बमचं नाव होतं ‘वूडलँड स्केचेस’. यात पियानोवर वाजवण्यासाठी केलेल्या 10 संगीत रचना आहेत. अरण्यातल्या दैनंदिन जीवनात दिसणाऱया गोष्टींवर या रचना केल्या होत्या. यातली अजून एक गाजलेली रचना म्हणजे ‘To a water lily’. पाण्यात येणाऱया, काहीशा कमळासारख्या दिसणाऱया water lily नं प्रेरित होऊन त्यानं ही रचना केली होती. ओसाड रानापासून ते हिरवळीतल्या झऱयापर्यंत अशा अरण्यातल्या बऱयाचशा विषयांवर त्यानं या अल्बममध्ये रचना केल्या.
‘To a wild rose’ ही रचना आजही ऐकताना त्यातलं साधेपणातलं सौंदर्य जाणवल्यावाचून राहत नाही !





























































