
>> नवनाथ शिंदे
पुणे-शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात सराईत टोळक्यांनी धुडगूस घातला होता. दिवसाढवळ्या लुटमार, खून, खूनाचा प्रयत्न, मारामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी दोन वर्षांपासून मोक्का कारवार्डचा बडगा उगारला आहे. त्यांनी पुण्यातील तब्बल 870 हून अधिक सराईतांना वेगवेगळ्या कारागृहात डांबून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले आहे. तब्बल 92 टोळ्यातील सराईतांचा सुफडासाफ केल्यामुळे शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे.
सराईत टोळ्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत हैदोस घातला होता. दुचाकीस्वार चोरटे, शस्त्राचा वापर करीत लुटमार करणाऱ्यांसह दादागिरी व भाईगिरी करीत दहशत माजविणाऱ्या टोळक्याने अशांतता माजविली. त्यामुळे पोलिसांनी संबंधित टोळ्यांची कुंडली तयार करून त्यांच्याविरूद्ध थेट मोक्कानुसार कारवाईचा धडाका सुरू केला. एकापाठोपाठ एक टोळक्याविरूद्ध मोक्का कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली. झाडाझडती सुरू केल्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी सराईत गुन्हेगारांची पळताभुई झाली. अनेकांनी तर हद्दीतील पोलस ठाण्यात हजेरी लावण्यास सुरूवात केली. साहेब आम्ही पोलीस ठाण्यात हजर होतो, पण मोक्का कारवाई करू नका, इथून पुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नसल्याची हमी दिली. मात्र, गुन्हेगारीमध्ये सामील असल्यास तुमची थेट कारागृहात रवानगी होणार असा मेसेज पोलिसांनी कारवाईतून दिला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जवळपास दोन वर्षांत मोक्का कारवाईनुसार सराईत 92 टोळ्यातील तब्बल 870 हून सराईत गुंडांची कारागृहात रवानगी केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून मोक्का कारवाई शतकाजवळ पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका वेगाने उगारल्यामुळे सराईतांनी धास्ती घेतली आहे. कायदा सुव्यस्था राखण्यासाठी सराईतांची प्रत्येक पोलीस ठाण्यात हजेरी घेतली जात आहे. विशेषतः खूनाचा प्रयत्न, मारामारी, लुटमार, दरोड्यातील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय भाईगिरी करणाऱ्यांनाही एमपीडीएनुसार तुरूंगात डांबले जात आहे.
हजर होतो पण मोक्काचे रेकार्ड नको
संघटित गुन्हेगारी केल्याप्रकरणी मोक्का कारवाई झाल्यास दोन ते तीन वर्षांसाठी कारागृहात खितपत पडावे लागेल. या धास्तीने सराईत टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक गुन्हेगार नित्यनियमाने पोलीस ठाण्यात हजेरी लावत आहेत. साहेब आम्ही स्वतःहून हजर होतो, पण मोक्का कारवाईचे रेकॉर्ड तयार करू नका. आम्ही कोणताही गुन्हा करणार नाही, काहीही करा पण मोक्का कारवाई नको अशी विनवणी त्यांच्याकडून केली जात आहे.
सराईत गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करून शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासह नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यात आले आहे. विशेषतः ‘मोक्का’, ‘एमपीडीए’ नुसार कारवाई केल्यामुळे टोळ्यांचा बिमोड झाला आहे. त्याशिवाय गुन्हेगारांविरूद्ध आणखी कडक कारवाईचे प्लॅन तयार करण्यात येत आहेत . – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर



























































