
स्पेनमध्ये शनिवारी पहिला मंकीपॉक्सचा बळी गेला असतानाच हिंदुस्थानातही शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा मृत्यूही मंकीपॉक्समुळेच झाल्याची माहिती आज समोर आली आहे. केरळच्या त्रिचूरमधील खासगी रुग्णालयात मृत्युमुखी पडलेला तरुण हा संयुक्त अरब अमिरातीमधून परतला होता. त्याने तिथे मंकीपॉक्सची केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, ही गोष्ट त्याने कुटुंबापासून लपवली होती. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी शनिवारी तपासणी अहवाल आमच्याकडे सोपवला, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. दरम्यान, केरळच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत त्याला मंकीपॉक्सची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.




























































