बेस्ट उपक्रमाच्या महापालिकेतील विलीनीकरणाला उद्या रविवारी 7 ऑगस्ट रोजी 75 वर्षे पूर्ण होत असून ‘बेस्ट उपक्रमातर्फे ‘अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने उपक्रमांच्या वतीने मुंबईकरांकरीता विविध योजना सादर केल्या जाणार असून अलिकडेच सुरू केलेल्या ‘होप- ऑन, होपऑफ’ या एसी इलेक्ट्रीक पर्यटन बससेवेचा सुरूवातीच्या थांब्यात बदल केला असून तो आता सीएसएमटी पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्याची लांबीही कमी करण्यात आली आहे.
मुंबई शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि किफायतशीर बससेवा पुरवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने लंडनच्या धर्तीवरील Hop On – Hop off म्हणजेच “Ho – Ho” पर्यटन बससेवा एसी इलेक्ट्रीक बसेसद्वारा अलिकडेच सुरू केली होती. या बसेसचा सुरुवातीचा थांबा आता सीएसएमटीच्या बस स्थानकाच्या परिसरातून सुरू होणार आहे. स.9 ते सायं.8 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणाहून दर एका तासाच्या अंतराने पर्यटकांसाठी बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या बससेवेचे पर्यटन शुल्क प्रति व्यक्ती 150/- रुपये इतके ठेवण्यात आले आहे. पर्यटकाने एखाद्या पर्यटनस्थळी बसगाडीतून उतरून त्या पर्यटन स्थळाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर पुढच्या फेरीच्या बसगाडीतून पुढील पर्यटन स्थळापर्यंत त्याच तिकिटावर प्रवास करता येईल अशी सुविधा असणार आहे. पर्यटकांना या पर्यटन बससेवे व्यतिरिक्त बेस्टच्या इतर बसमार्गांचा वापर करून देखील मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील असे बेस्टचे जनता संपर्क प्रमुख मनोज वराडे यांनी सांगितले.
• असा असेल मार्ग –
हो – हो (Ho Ho ) बससेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होऊन म्युझियम, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बाबुलनाथ, पेडर रोड, हाजी अली, महालक्ष्मी रेस कोर्स, धोबी घाट (महालक्ष्मी स्थानक), जिजामाता उद्यान मार्गे जे. जे. उड्डाण पुलावरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी चालविण्यात येणार आहे. तरी सर्व पर्यटक, मुंबईकरांनी या बससेवेचा लाभ घेऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.

























































