
>> प्रा. अनिल कवठेकर
मराठी सिनेसृष्टीचा ‘दादा’ अशी ओळख असणारे दादा कोंडके, द्वयअर्थी संवाद आणि संवादफेकीच्या त्यांच्या विशिष्ट विनोदी शैलीने सिनेरसिकांना मनमुराद हसवले. मराठी सिनेसृष्टीला सुवर्ण दिवस दाखवणाऱया दादा कोंडके यांच्या 8 ऑगस्ट या स्मृतिदिनानिमित्त केलेला मानाचा मुजरा…
दादा कोंडके यांचा प्रत्येक चित्रपट म्हणजे मनमुराद हसवणूक. आपला चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित करायचा असा आजच्या काळातल्या अनेक निर्मात्यांना प्रश्न पडतो. जर तो योग्य वेळी प्रदर्शित झाला नाही तर तो चालेल की नाही याची त्यांना खात्री नसते. कारण या निर्मात्यांनी स्वतःचा प्रेक्षक वर्ग निर्माणच केलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दादांचा एक प्रेक्षक वर्ग होता. दादांच्या वैशिष्टय़पूर्ण शैलीमुळे दोन प्रकारचा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला होता. एक वर्ग जो त्यांच्यावर आणि त्यांच्या चित्रपटांवर प्रेम करणारा होता, तर दुसरा त्यांच्या चित्रपटांना अश्लील म्हणणारा, नापं मुरडणारा, पण गुपचूप त्यांचे चित्रपट पाहणारा होता. म्हणूनच त्यांचा प्रत्येक चित्रपट तुफान चालायचा. पहिल्या प्रकारात मोडणारे प्रेक्षक मनोरंजन म्हणून पाहायचे आणि दुसऱया प्रकारातले प्रेक्षक नावं ठेवत पाहायचे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करताना दादांना कधीही अडचण आली नाही.
दादांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात विलक्षण वेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘सोंगाडय़ा’मधला सोंगाडय़ा, ‘पांडू हवालदार’मधला पांडू, ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’मधला पुस्तक वाचनाचं वेड असणारा धोबी, पोस्टमन, मुका, सनईवाला, ‘ह्योच नवरा पाहिजे’मधला इंग्रजी बोलण्याचं वेड असणारा… या सर्व व्यक्तिरेखा समाजात आपल्या अवतीभोवती दिसतात. त्या सगळय़ांना आपल्या विशिष्ट शैलीत साकारून दादांनी अजरामर केल्या.
दादा कोंडके म्हणजे एक हरहुन्नरी कलाकार होते. त्यांना मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची नस नेमकी सापडली होती. सामान्य माणसांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सौंदर्याच्या कल्पना, बोलीभाषेतले शब्द, ओठावर रेंगाळणाऱया गीतांच्या चाली… हे सगळं रसायन त्यांनी लीलया जमवून आणलं होतं. त्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या जिभेवर त्या गाण्यांची चव अमृततुल्य चहासारखी कायमच रेंगाळत राहिली आहे.
दादांचं ‘ये जवळ ये लाजू नको…’ हे गाणं तर इतपं प्रसिद्ध झालं की, धर्मेंद्रच्या ‘कहानी किस्मत की’ या हिंदी चित्रपटातल्या एका गाण्याच्या शेवटच्या कडव्यात या ओळींचा समावेश करण्यात आला होता. धोतर, सदरा, फेटा… असा मराठमोळा पोशाख केलेला धर्मेंद्र आणि नथ घातलेल्या नऊवारी साडीतल्या रेखाने धमाल उडवून दिली होती. ही आहे दादांची जादू.
त्यांच्या गाण्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गाण्यांमध्ये नायिकेचं नाव असायचं. उदाहणार्थ, ‘काय गं सखू’मधली सखू, ‘अगं विमला, तुझा माझा जोडा भारी जमला’मधली विमला किंवा ‘अगं हौसा, भर दिवसा’मधली हौसा. त्यांच्या गाण्यातले संवाद त्या गाण्याला अगदी सोपं करून टाकतात. त्या गाण्यातली लय, ताल त्यातली गंमत वाढवतात. अशा संवादरूपी गाण्यांनी त्यातल्या गोडव्यात कधीच बाधा आणली नाही, तर गुणगुणायला भाग पाडलं. ‘सोंगाडय़ा’मधले गाण्यातले संवाद पाहू या…
तो ः काय गं सखू
तीः बोला दाजीबा
तोः काय गं सखू बोलू का नकू, घडीभर जरा थांबशील का?
थांबशील का गं, गोड गोड माझ्याशी बोलशील का?
तीः काय सांगू बाई, लय मला घाई, दाजीबा थांबायला वेळच नाही
तोः डोईवर घेऊन चालली काई?
तीः डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दूध आहे गाईचं, गाईचं, घेता का दाजीबा वाईच…
किती साधासोपा ग्रामीण तरुण-तरुणीचा प्रेमसंवाद. अशी गाणी लिहायला कठीण असतात. प्रश्न आणि उत्तर हे गाण्याच्या मीटरमध्ये बसलं तरच ते श्रवणीय होतं. दादांना हे चांगलंच जमून गेलं होतं. साधेपणा हीच दादांच्या गाण्यांमधली ताकद होती.
जगामध्ये दोनच अभिनेत्यांनी आयुष्यभर रसिकांना खदखदून हसवलं. एक चार्ली चॅप्लिन आणि दुसरे आपले दादा काsंडके होय. बावळट, गोंधळलेला, भोळसट… म्हणजे त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका. त्या भूमिका लोकांना आवडल्या, कारण त्यात (अवगुण) असले तरी त्या व्यक्तिरेखा अत्यंत प्रामाणिक होत्या.
दादांच्या प्रत्येक चित्रपटातला नायक, नायकाची आई, नायिका, खलनायक, संगीतकार, सहकलाकार सगळे तेच असायचे. मात्र विषय वेगळे असायचे. त्या सगळय़ा टीमला घेऊन जो काही गोंधळ घातला जायचा तो पाहताना खूप धमाल यायची.
त्यांच्याकडे असलेला हजरजबाबीपणा लोकांना आवडला आणि तो त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवला. दादांच्या चित्रपट दृश्यांच्या क्रमामध्ये एक सहजता होती. पुढचे दृश्य काय येणार आहे याची कल्पना आधीच्या दृश्यामध्येच संवादातून यायची. त्यांचे हजरजबाबी संवाद हे लक्षपूर्वक ऐकले तर आणखी आनंद मिळतो.
द्वय़र्थी संवादाला नावं ठेवणारी बरीच मंडळी होती, पण मराठी भाषेवर ज्याचा अधिकार आहे, तोच माणूस सहजगत्या अशा प्रकारे मराठी भाषेला वळवू शकतो आणि त्यातली गंमत लोकांसमोर आणू शकतो. शेवटी शब्दाचा अर्थ कोणता घ्यायचा, हे प्रेक्षकांवर असल्याने त्यातली गंमत गंमतच राहू शकली.
1975 साली आलेला ‘शोले’ आणि ‘पांडू हवालदार’ एकाच सुमारास प्रदर्शित झाले होते. सांबा आणि गब्बर प्रसिद्ध झाले होतेच, परंतु पांडू जास्त प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून महाराष्ट्र पोलिसांना पांडू म्हणून संबोधन मिळालं.
दादा त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून अंधश्रद्धेवर टीका करत. दादा विनोद करायचे, त्याचबरोबर समाजातल्या पह्लपणावरही बोट ठेवायचे. दादांचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी फार जवळचे संबंध होते. ते संबंध त्यांच्या चित्रपटांतून, संवादांतून अधोरेखित होत असत. ‘आपल्या गावाचं नाव शिवापूर, म्हणजे आपल्या गावातली शिवापूरची सेना म्हणजे शिवसेना होय…’ अशा प्रकारे त्यांचे शिवसेनेशी असलेले ऋणानुबंध आणि निष्ठा व्यक्त होत असे.
दादा हा अनुभवण्याचा विषय आहे आणि तो समजल्याशिवाय अनुभवता येत नाही व अनुभवल्याशिवाय समजतही नाही.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)


























































