
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीने इशारा पातळी गाठली आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनासह नगर परिषद नियंत्रण कक्षदेखील सज्ज केले आहे. दरम्यान, धोकादायक बनलेल्या परशुराम घाटातील वाहतूक दिवसा सुरूच ठेवली आहे.
मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्टी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. वाशिष्ठी नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. बाजारपेठेतील बाजारपूल, नाईक कंपनी, भेंडीनाका, रंगोबा साबळे मार्ग, वडनाका, एकविरा देवी मंदिर, जुना कालभैरव मंदिर रस्ता या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. पहाटेपासून शहर आणि ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धो-धो पाऊस पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महामार्गावर डीबीजे महाविद्यालय, कापसाळ, बाजारपेठेतील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणी साचले आहे.



























































