
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो जगभरातील T20 लीगमध्ये स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातो. वयाच्या 38 व्या वर्षीही ब्राव्होच्या क्रिकेट खेळण्याच्या कामगिरीमध्ये कोणतीही कमतरता आलेली नाही. ब्राव्होच्या याच कामगिरीमुळे त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. गुरुवारी त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली. द हंड्रेड स्पर्धेत खेळताना त्याने टी-20 क्रिकेटमध्ये आपले 600 बळी पूर्ण केले. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला 500 बळींचा टप्पा देखील गाठता आलेला नाही.
नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना ड्वेन ब्राव्होने ओव्हल इन्व्हिन्सिबल्सविरुद्ध ही कामगिरी केली. या सामन्यापूर्वी ब्राव्होच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 598 विकेट्स होत्या. त्याने या सामन्यात 20 चेंडूत 29 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याने अष्टपैलू सॅम करनला बाद करत आपले 600 बळी पूर्ण केले. त्यामुळे ब्राव्हो आता जागतिक क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ अफगाणिस्तानच्या राशिद खानचा क्रमांक लागत असून त्याने 466 बळी घेतले आहेत.
ड्वेन ब्राव्होच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतरही त्याचा संघ या सामन्यात 3 विकेट्सने पराभूत झाला. प्रथम फलंदाजी करताना अॅडम लेथच्या 33 चेंडूत 79 धावांच्या जोरावर नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाने 157 धावा केल्या. सॅम करनच्या झंझावाती खेळीच्या जोरावर ओव्हलने ही धावसंख्या गाठली. करनने 39 चेंडूत 60 धावा केल्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
ड्वेन ब्राव्हो – 600
रशीद खान – 466
सुनील नरेन – 460
इम्रान ताहिर – 451
शकीब अल हसन – 418

























































