विमुक्ता – राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवाची पदकसुंदरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धा दरवेळी नवा इतिहास रचते. हिंदुस्थानच्या दृष्टीने तर हा इतिहास महत्त्वाचा ठरला. एम्मा मॅककॉन या ऑस्ट्रेलियन जलतरणपटूने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये विक्रम केला. जगातली सर्वोत्कृष्ट ऍथलिट ठरण्याचा सन्मान मिळवला. एकटय़ा मॅककॉनने या स्पर्धेमध्ये सहा सुवर्ण, एक रजत आणि एक कास्य पदकांसह आठ पदकांची कमाई केली आहे. या यशाला हिंदुस्थानी परिवेशातून पाहायला हवे.

नुकताच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप समारंभ पार पडला. हिंदुस्थानने दिमाखदार कामगिरी करत पदकतालिकेमध्ये आपला चौथा नंबर सोडला नाही. हिंदुस्थानने राष्ट्रकुल स्पर्धेत यंदा इतिहास रचला. खेळाडूंनी 22 सुवर्णपदकांसह या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत मानाचे स्थान पटकावले आहे. 16 रुपेरी आणि 23 कास्य पदके मिळून 61 पदकांची कमाई हिंदुस्थानने केली आणि सातत्य कायम ठेवले. यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत एका ऑस्ट्रेलियन पदक सुंदरीचा जन्म झाला. अर्थात त्याला जन्म तरी कसे म्हणावे? बाराव्या वर्षापासून सातत्याने जलतरणाचा सराव करीत वयाच्या अठ्ठावीस वर्षी ही तरुणी वैयक्तिक पदकांच्या श्रेणीमध्ये सर्वात उच्च स्थानावर जाऊन बसली. जलतरणाच्या फ्री स्टाईल आणि बटरफ्लायमध्ये हात धरू शकणारा जलतरणपटू आजवर दिसलेला नाही. मॅककॉनची कामगिरी स्त्राr आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये सर्वात सरस आहे. 4 x 100 रिले स्त्राr आणि मिश्र स्पर्धा, वैयक्तिक 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर जलतरण स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये गेल्या सहा वर्षात मॅककॉनने सातत्य राखलेले दिसते.

एम्मा मॅककॉन या ऑस्ट्रेलियन जलतरणपटूने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये विक्रम केला. एकटय़ा मॅककॉनने या स्पर्धेमध्ये सहा सुवर्ण, एक रजत आणि एक कास्य पदकांसह आठ पदकांची कमाई केली. याबरोबरच तिने एकूण ऑलिंपिक आणि राष्ट्रकुलस्पर्धेत 20 पदकांची देदीप्यमान लूट केली. आजवर वैयक्तिक खेळात एवढी पदके कोणीही मिळवलेली नाहीत. हिंदुस्थानी खेळाडू पी. व्ही. सिंधूने पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळवून दिले. तिची मेहनत आणि सरावातील सातत्य संपूर्ण हिंदुस्थानी जनता बघत आहे. त्यामुळे मॅककॉनने मिळवलेल्या यशामागे तिच्या परिश्रमांची कल्पना केलेलीच बरी.

मॅककॉनचा जन्म (24 मे, 1994) न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथे झाला. उंची 180 सेंमी, वजन 60 किलो. ऑलिम्पिक जलतरणपटू आणि चार वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले रॉन मॅककॉन यांची ती कन्या. तिची आई सूशी हीदेखील राष्ट्रकुल जलतरण स्पर्धेमध्ये खेळलेली आहे तर भाऊ डेव्हिड ऑलिम्पिक जलतरणपटू आहे. 2016 च्या ऑलिंपिकमध्ये डेव्हिड आणि एम्मा हे दोघेही बहीण-भाऊ एकाच टीममध्ये खेळण्याची वैशिष्टय़पूर्ण घटना घडली होती. त्यामुळे सबंध कुटुंबच जलतरण तलावात संपूर्ण रंगलेलं आहे. अर्थात, आई-वडिलांनी मिळवलेलं यश राखण्यासाठी त्याला तेवढय़ाच परिश्रमाची, सातत्याची आणि महत्त्वाकांक्षेची गरज असते, ते मॅककॉनमध्ये आहे. एम्माचे कुटुंब जलतरण आणि स्पर्धात्मक यशासाठी सराव करून घेत असे. तिचे बालपणच जलतरण तलावाच्या काठी गेले. डेव्हिडने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करायला सुरुवात केली तेव्हा तिनेही भावासोबत जलतरणाला सुरुवात केली.

अनेक वर्षे एम्मा आणि डेव्हिड स्वतंत्रपणे वैयक्तिक सराव करत होते आणि त्यांचे कोच होते त्यांचे वडील रॉन मॅककॉन. विशेष म्हणजे रॉन स्वतः सर्वोत्कृष्ट जलतरणपटू होते. त्यांच्या तालमीत एम्मा आणि डेव्हिड तयार होत होते. वयाच्या 18 वर्षापर्यंत तिचे जलतरण हौसेची गोष्ट होती. त्यात व्यावसायिक स्पर्धेचा लवलेशही नव्हता. अर्थात, 2010 मध्ये तिने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय किशोर ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण पदक, दोन रजत पदके आणि तीन कांस्य पदके मिळवून चमकदार कामगिरी केली.

एम्मा ही जणूकाही जलतरण स्पर्धेसाठीच जन्मलेली मुलगी आहे हे तिच्या कुटुंबियांना समजले होते! तिचा सराव, लवचिकता, गती यामुळे ती विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकतही होती. पण एम्माला मात्र ऑलिंपिकसारख्या ठिकाणी आपण खेळू याची शाश्वती नव्हती. 2010 च्या स्पर्धा नंतर 2012 च्या ऑलिंपिकच्या अंतिम निवडीसाठी जेव्हा एम्मा सफल झाली नाही तेव्हा मात्र तिचे डोळे उघडले. जणूकाही आत्तापर्यंत हौसेची गोष्ट असलेली स्पर्धा हे तिचं लक्ष्य आहे हे तिला समजले. ऑलिंपिकसाठी निवड झाली नाही ही गोष्ट त्याच्या मनाला लागली आणि तिने जलतरण आपला राम राम ठोकला. पंधराव्या वर्षी तिने जवळजवळ स्पर्धेतून माघार घेतली होती.

2010 मध्ये किशोरवयीन पॅसिफिक चॅम्पियनशिप, किशोरवयीन ऑलिंपिक आणि जागतिक चॅम्पियनशिप होती. वयाच्या सतराव्या वर्षी ती ऑलिम्पिकसाठी निवडश्रेणीत तर गेली, पण तिची निवड मात्र होऊ शकली नाही. ती निराशेच्या गर्तेत फेकली गेली. तिला स्वतःला या गोष्टीची जाणीव होती की तिने तिच्या सरावाला गांभीर्याने घेतले नव्हते. मान मोडून सराव, संपूर्ण लक्ष्य केंद्रित केल्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या अंतिम संघामध्ये स्थान मिळू शकत नाही ते तिला माहितीच होते. लवकरच तिने सरावावर लक्ष केंद्रित केले.

अठराव्या वर्षापर्यंत आपल्या जीवनाचे ध्येय आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा हेच आहे हे तिला समजले. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ती चमकदार कामगिरी करणारी करणारी ऍथलिट ठरली. चार सुवर्ण आणि दोन कांस्य पदकाची कमाई तिने केली आणि त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. तिच्या पदकांच्या कमाईचा आलेख सातत्याने चढता राहिला.

शेवटी 2016 च्या ऑलिंपिकसाठी ऑस्ट्रेलियाची निर्विवाद निवड झाली. या टप्प्यावर मात्र तिला आंतरराष्ट्रीय कोच व्हिन्सी रेलेग यांच्या ब्रिस्बेन येथील संघात सामील झाली. या ऑलिंपिकमध्ये तिने एका सुवर्ण पदकाची कमाई केली आणि आपले खाते उघडले. पण लवकरच तिला निष्णात, एकमेवाद्वितीय होण्याचे वेध लागले. तिने मायकेल बोहल यांच्याकडे ब्रिस्बेन येथेच सराव करायला सुरुवात केली. पुढे त्यांची नियुक्ती ग्रिफिथ विद्यापीठात झाल्यानंतर तिने याच विद्यापीठात पब्लिक हेल्थ अँड हेल्थ प्रमोशन या विषयांमध्ये पदवी मिळवण्यासाठी अर्ज केला. आता ग्रिफीथ विद्यापीठ, बोहल आणि एम्मा यांची तुकडी प्रचंड यशस्वी झाली. त्याचे परिणाम 2020 च्या ऑलिंपिकमध्ये दिसून आले. 2020 मध्ये एम्मा मॅककॉनने तब्बल चार सुवर्णपदक एक चांदीचे आणि एक कास्य पदक जिंकले. ऑस्ट्रेलियन संघाची ती सर्वोत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडू ठरली.

प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धा दरवेळी नवा इतिहास रचते. हिंदुस्थानच्या दृष्टीने तर हा इतिहास महत्त्वाचा ठरला. त्यासोबतच एका महिलेने जगातली सर्वोत्कृष्ट ऍथलिट ठरण्याचा सन्मान मिळवला. या यशाला हिंदुस्थानी परिवेशातून पाहायला हवे. उपलब्ध साधन संपत्ती, खेळाडूचे नैपुण्य ओळखणे आणि त्यांना योग्य ती संधी देणे, अनेक होतकरू खेळाडू घडवणं आणि देशाचे नाव उज्ज्वल करणे हे ऑस्ट्रेलिया देशाने सातत्याने केले आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धकांचा यशाचा आलेख बघता तो केवळ अद्वितीय आणि अपराभूत देश आहे. इतर देशांसाठी अत्यंत मार्गदर्शक असा धडा एम्मा मॅककॉन आणि ऑस्ट्रेलिया देश या राष्ट्रकुल स्पर्धेनिमित्त यांनी दिला आहे.

[email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत.)