लग्नाचा तगादा लावणे तरुणीच्या जिवावर बेतले, प्रियकराने भाईंदरच्या खाडीत फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावणाऱया तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्याशी लग्न करायची इच्छा नसल्याने प्रियकराने तिला भाईंदर खाडीत फेकले. मलबार हिल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मलबार हिल येथील डेसिलिया इमारतीत राहणारी अनिता (20, बदललेले नाव) ही तरुणी 31 जुलैपासून बेपत्ता झाली होती. बराच वेळानंतरही ती घरी न आल्याने तिच्या चुलत भावाने मलबार हिल पोलीस ठाण्यात अनिता हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अनिताच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता विरार पूर्वेकडे राहणारा अभिषेक सरफरे हा तरुण तिच्या संपर्कात होता असे आढळून आले. त्यामुळे अभिषेककडे जाऊन त्याची चौकशी केली, परंतु तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली.

2016 मध्ये गावी असताना दोघांचे प्रेमसंबंध जुळले. तेव्हापासून दोघे एकत्र होते, मात्र अलीकडे ती लग्नासाठी तगादा लावू लागली. पण लग्न करायची इच्छा नसल्याने तो तिला टाळू लागला. दरम्यान एकेदिवशी लग्नावरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा अनिताने शिवीगाळ करत त्याला धमकावले. याच रागातून अभिषेकने कट रचला आणि त्यानुसार तो तिला गोडीगुलाबीने भाईंदर खाडी बघण्याच्या निमित्ताने तेथे घेऊन गेला. रेल्वे ब्रिजवर अनिता बेसावध असताना त्याने तिला खाडीत फेकले.