
भाजपमध्ये वाजपेयी-आडवाणी युग असताना आडवाणींच्या समर्थक अशा गटाला ‘डी फोर’ म्हटले जात असे. अशा आडवाणी युगातील डी फोरचा अखेरचा दुवा असणाऱ्या व्यंकय्या नायडू यांच्या राजकीय कारकिर्दीची अखेर गेल्याच आठवडय़ात झाली. उपराष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यानंतर नायडू यांच्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. व्यंकय्या, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंत कुमार हा आडवाणींचा डी फोर ग्रुप त्याकाळी दिल्लीत खूपच प्रभावशाली होता. दुसरीकडे अटलजींना साथ देण्यासाठी प्रमोद महाजन असत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यानंतर ‘डी फोर’शी साहजिकच त्यांचे सूत जुळू शकले नाही.
अरुण जेटलींकडे मोदी-शहा जोडीचा कोर्टकज्जा असल्याने जेटलींशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. मात्र 2013 मध्ये गोव्याच्या अधिवेशनात मोदींना भाजपच्या निवडणूक अभियानाचे प्रमुख बनविण्यास विरोध केल्यापासून सुषमा स्वराज तर मोदींच्या रडारवर होत्याच. तीच बाब व्यंकय्या व अनंतकुमारांच्या बाबतीत घडली. ‘डी फोर’चे चारही दिग्गज मोदींच्या सरकारमध्ये मंत्री बनले खरे, मात्र पंतप्रधानांसोबत त्यांचे टय़ुनिंग जुळल्याचे कधीच दिसले नाही. त्यात दुर्दैवाने मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये अनंतकुमारांचे निधन झाले तर दुसऱ्या टर्ममध्ये सुरुवातीला सुषमा व नंतर जेटलीही गेले. त्यामुळे ‘डी फोर’चा अखेरचा दुवा नायडूंच्या रूपाने शिल्लक राहिला.
नायडूंना अचानक उपराष्ट्रपतीपदी नेमण्यात आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सक्रिय राजकारणातून बाजूला जाण्यास नायडू तयार नव्हते. मात्र शेवटी त्यांना हे पद स्वीकारावे लागले. निरोप समारंभात नायडूंनीच हा किस्सा सांगितला. त्यापेक्षाही नायडू यांनी महत्त्वाचे प्रतिपादन केले, ते सध्याच्या सत्ताधाऱ्यांना कान गोळा करून ऐकण्यासारखे आहे. राजकारणात शत्रुत्वाला थारा असत नाही. राजकीय प्रतिस्पर्धी हा शत्रू नसतो. राजकीय स्पर्धा निकोप असावी, अशी अपेक्षा नायडूंनी बोलून दाखविली आहे. नायडूंचा रोख नेमका कोणाकडे होता, हे काय वेगळे सांगायला हवे?





























































