
>> देवकीनंदन मुकादम (अध्यक्ष, वरळी साने गुरुजी कथामाला, मुंबई)
कोळी समाजाचे पितामह, बहुजन समाजाचे नेते, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी सेवा संघाचे आधारस्तंभ व मुंबईचे माजी महापौर बाबासाहेब वरळीकर ऊर्फ वासुदेव बाळकृष्ण वरळीकर यांचा जन्म 15 जून 1909 रोजी वरळी कोळीवाड्यात कोळी समाजातील कुटुंबात झाला. शालान्त परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला. परंतु त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले.
महात्मा गांधींनी हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे अखेरचे रणशिंग फुंकले. 9 ऑगस्ट , 1942 रोजी मुंबईमध्ये ऑगस्ट क्रांती मैदान येथे ‘छोड़ो भारत’चा नारा दिला. हजारो तरुणांनी आंदोलनात स्वतःला झोकून दिले. बाबासाहेब वरळीकर यांनीही या लढ्यात भाग घेतला व त्यांना कारावासही भोगावा लागला. या कालावधीमध्ये त्यांचा पी. के. सावंत, भाऊसाहेब राऊत, माजी महापौर स. का. पाटील, खाडीलकर, माजी सभापती सयाजीराव सीलम, माजी महापौर पुप्पाला, मोरारजी देसाई आदी ज्येष्ठ गांधीवादी नेत्यांशी संपर्क आला. परिणामी त्यांची गांधीवादावरची निष्ठा आणि अहिंसेवरची श्रद्धा दृढ झाली. बाबासाहेब वरळीकर यांच्या रूपाने कोळी समाजाला निस्पृह व कणखर नेतृत्व मिळाले. किनारपट्टीवरील मच्छीमारी करणाऱ्या कोळी समाजाची आर्थिक उन्नती औद्योगिक क्रांतीशिवाय होणार नाही असा विचार परिषदेच्या नेत्यांनी केला व अखिल कोळी समाज फिशरीज प्रोड्यूसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नावाची पहिली मच्छीमार सहकारी संस्था निर्माण केली. या उपक्रमाचे फलित संपूर्ण महाराष्ट्रात मच्छीमार सहकारी संस्थांचे जाळे पसरवण्यात आले व समाजाची आर्थिक पिळवणूक रोखण्यास मदत झाली. या चळवळीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
बाबासाहेबांचा मूळ पिंड सामाजिक सेवेचा होता. पुढे ते राजकारणात ओढले गेले. वरळी गावचे प्रतिनिधी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीस उभे राहिले व नगरसेवक म्हणून निवडून आले. बाबासाहेब सतत 27 वर्षे काँग्रेसचे नगरसेवक म्हणून महापालिकेत होते. त्या काळात त्यांनी सर्व समित्यांची अध्यक्षपदे भूषविली. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते महापालिकेत लोकप्रिय व अजातशत्रू होते. सर्वपक्षीय नगरसेवक प्रेमाने त्यांना ‘बुवा वरळीकर’ असे म्हणत. पुढे त्यांना मुंबईचे ‘महापौर’ होण्याचा बहुमान मिळाला. महापौरपदाच्या कारकीर्दमध्ये बॅण्ड स्टॅण्ड येथे बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. तसेच किंग्ज सर्कल या गार्डनचे नामकरण माहेश्वरी उद्यान करण्यात आले. बाबासाहेबांना कोळी समाजाविषयी फार आस्था होती. अखिल कोळी समाज परिषदेचे ते अध्यक्ष होते. कोळी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी ठाणे जिह्यात सातपाटी येथे ‘आदि जनता हायस्कूल’ सुरू केले. नाशिक येथे आदि जनता वसतिगृह, तर जळगाव येथील ‘आदि जनता विद्यार्थी वसतिगृह’ व ‘सागर हायस्कूल’ उभारण्यात शिक्षणप्रेमी बाबासाहेबांचा फार मोठा वाटा होता. कोळी समाज एकसंध व्हावा यासाठी बाबासाहेब प्रयत्नशील होते. पुढे ते अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष झाले. पंढरपूर येथे अखिल भारतीय कोळी समाजाचे अधिवेशन बाबासाहेबांच्या पुढाकाराने झाले.
थोर शिक्षणतज्ञ डॉ. रामचंद्र काशीनाथ शिरोडकर यांच्याशी संबंध आल्यावर बाबासाहेबांनी परेलसारख्या कामगार वस्तीमध्ये ‘केएमएस परेल हायस्कूल’ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. पुढे बाबासाहेब याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि आनंदी स्वभावामुळे ते ‘आदर्श शिक्षक’ म्हणून ओळखू लागले. मुंबई समाज शिक्षण समितीचे ते उपाध्यक्ष असताना त्यांनी साक्षरता प्रचार कार्याचा प्रसार केला. मुंबई महापालिका सभागृहात त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते 18 फेब्रुवारी, 1976 रोजी महापौर नाथालाल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब वरळीकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. 20 मार्च, 1977 रोजी त्यावेळचे विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे यांच्या हस्ते व तत्कालीन महापौर मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत बेंगाल केमिकल्स सेंच्युरी बाजार येथील चौकाचे ‘बाबासाहेब वरळीकर चौक’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी जनता हायस्कूलसमोरील बाबासाहेबांचा अर्धपुतळा बसविलेल्या उद्यानाला ‘बाबासाहेब वरळीकर मनोरंजन उद्यान’ असे नामकरण 28 नोव्हेंबर, 2017 रोजी माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. बाबासाहेब वरळीकरांनी आपल्या जीवनात सत्य, अहिंसा, चारित्र्य, त्याग, सचोटी, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि जाज्वल्य निष्ठा या तत्त्वांचे पालन केले. सभ्यता व सुसंस्कृतपणा वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही टिकवून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.



























































