मुंबई गुन्हे शाखेची गुजरातमध्ये मोठी कारवाई, 1026 कोटीचा एमडी साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाने गुजरातमध्ये धडक कारवाई केली. अंकलेश्वर येथील एका कारखान्यात छापा टाकून पोलिसांनी तब्बल 1026 कोटीचा एमडी साठा तसेच एमडी बनविण्यासाठी लागणारी 812 किलो पेक्षा जास्त सफेद रंगाची पावडर आणि 397 किलो पेक्षा जास्त तपकिरी रंगाचे खडे जप्त केले आहे. एमडीचा कारभार करणाऱ्या गिरीराज दिक्षित या आरोपीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अमंली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनीटने मार्च महिन्यापासून ड्रग्ज माफियांची टोळी उद्धवस्त करण्यास सुरुवात केली आहे. टोळीतील सहा जणांना पकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा जप्त केला होता.त्यापैकी एक असलेल्या व नालासोपाऱ्यात राहणाऱ्या प्रेमप्रकाश सिंग याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडून 1403 किलोचा एमडी साठा जप्त केला होता. त्यानंतर अंबरनाथ येथे ज्या फॅक्टरीमध्ये प्रेमप्रकाश एमडी बनवित होता, त्या फॅक्टरीचा मॅनेजर किरण पवार याला पकडून 90 लाखांचा एमडी हस्तगत केला होता.

अशाप्रकारे प्रेमप्रकाश व त्याच्या अन्य पाच साथीदारांना पकडून हजारो कोटींचा एमडी  साठा पोलिसांनी जप्त केला होता. दरम्यान, प्रेमप्रकाश सिंग याच्या चौकशीत गुजरातच्या अंकलेश्वर येथील फॅक्टरीत एमडी बनविणाऱ्या  गिरीराज दिक्षित याचे नाव समोर येताच पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तेथे धडक दिली.अंकलेश्वर येथील रासायनिक कारखान्यातून 513 किलो पेक्षा जास्त वजनाचा एमडीचा साठा व एमडी बनविण्यासाठी लागणारी पावडर आणि खडे जप्त करण्यात आले.

अंकलेश्वरमध्ये एमडी बनवून मुंबईला पाठवायचा

गिरीराज दिक्षित याला केमिकलचे बरेच ज्ञान असल्याने तो स्वतः एमडी बनवितो. गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रेमप्रकाश आणि गिरीराज एकमेकांच्या संपर्कात आहेत. 2021 मध्ये गिरीराजने बऱ्यापैकी एमडीचा साठा प्रेमप्रकाशकडे पाठविला होता, असे तपासात समोर आले आहे. अंकलेश्वर येथे मोठा रासायनिक कारखाना असून तेथेच गिरीराज एमडी बनवायचा. यासाठी तो कारखान्यातील साधनसामुग्री, कर्मचाऱ्यांचा वापर करायचा. मागणीनुसार एमडी तयार झाला कि तो प्रेमप्रकाशकडे पाठवून द्यायचा असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वरळी युनीटने मार्च माहिन्यात गोवंडी येथे शामशुल्ला खान या तस्कराला पकडून 37 लाख 50 हजाराचा एमडी जप्त केला. मग अयुब शेख या तस्कराला अडीच किलो वजनाच्या एमडीसह पकडले होते.त्यानंतर रेश्मा आणि रियाज मेमन यांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. यासर्वांच्या चौकशीत  नालासोपारा येथे राहणारा प्रेमप्रकाश सिंग हा स्वत एमडी बनवित असल्याचे उघड झाले. मग प्रेमप्रकाश व अंबरनाथ येथील फॅक्टरीत मॅनेजरचे काम करणाऱ्या किरण पवारला बेड्या ठोकण्यात आल्या. प्रेमप्रकाशच्या चौकशीत गुजरात कनेक्शन असल्याचे समजताच अंकलेश्वर तालुक्यातील पानोला जीआयडीसी येथील कारखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली.