
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 भुयारी मार्गाच्या पहिल्या ट्रेनच्या आठ डब्यांचे चार्जिंग सुरू करण्यात आले असून या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या गाडीच्या डिझाईन चाचण्यांना सुरुवात होणार आहे. या भुयारी मार्गाचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू करण्याची घोषणा नुकतीच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केली आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथील अल्स्टॉमच्या कारखान्यातून मेट्रो-3 चा पहिला प्रोटोटाईप रेक नुकताच मुंबईत दाखल झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी या ट्रेनच्या आठही डब्यांना 25 के.व्ही. एसी व्होल्ट्स इतक्या उच्च दाबाने चार्ज करण्यात आले. वातानुकूलित यंत्रणा, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, संवाद प्रणाली, ट्रेनचे भोंगे, आतील विद्युत यंत्रणा आदीच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या ट्रेनची चाचणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्यात येईल.





























































