
देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता चौथी लाट सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. फक्त हिंदुस्थानातच नाही तर चीन आणि अमेरिकेमध्येही कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सामान्य नागरिकांसह दिग्गज मंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन (Jill Biden) यांना कोरोनाची लागण झाली होती. आता कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोर्ला (Pfizer CEO Albert Bourla) यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.
फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी सोमवारी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. बोर्ला यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. याबाबत त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. मी जनतेला सांगायचंय की माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आयसोलेशनमध्ये असून खबरदारी घेण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असे बोर्ला यांनी निवेदनामध्ये म्हटले.
मी आभारी आहे की फायझर बायोटेक लसीचे चार डोस घेतल्याने मला कोरोनाची लागण होऊनही सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे मला बरं वाटतेय, असेही अल्बर्ट बोर्ला यांनी म्हटले. तसेच मी Paxlovid घेण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, FDA ने अमेरिकेमध्ये डिसेंबर 2021 पासून Paxlovid च्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. Paxlovid चा वापर सौम्य ते मध्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी केला जातो. 12 वर्षापुढील कोणतीही व्यक्ती या औषधाचा वापर करू शकतो. विशेष म्हणजे जो बायडेन यांनीही कोरोनाची लागण झाल्यानंतर याच औषधाचा वापर केला होता.
जो बायडेन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. 79 वर्षांच्या बायडन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नाक वाहणे, थकवा येणे आणि कोरडा खोकला अशी लक्षणे जाणवत होती. त्यांना अँटिव्हायरल पॅक्सलोव्हिड (Paxlovid) देण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
तत्पूर्वी सोमवारी जो बायडेन यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडने यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. परंतु सायंकाळी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून लागल्यानंतर त्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. परंतु पीसीआर टेस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.



























































