
>> मलिका अमरशेख
काही झाडं… रोपटी तुटली की वाढतच नाहीच… काही झाडं पानगळ झाली की परत बहरतच नाहीत. तर काही रोपटी पहा, इमारतीच्या भेगेत, कौलांच्या फटीत, अंधाऱ्या विहिरीतल्या दगडी खबदाडीत आपले हिरवे हिरवे हात हलवत वाढतच राहतात… माणसांच्या आयुष्यासारखी.
काही कळय़ा फुलण्याआधीच खुडल्या जातात, तर काही झाडांना फळं-फुलं नसण्याचा शाप घेऊनच ती तगून राहतात. पिंपळ, वड, आंबा यांचं भाग्य मोठंच. एखाद्या मोठय़ा संपन्न घरात भाऊबंद, नातवंडं, येणारे-जाणारे यांचा राबता असावा तशी ही झाडं… सळसळतं हिरवंगार हसू. हसत येणाऱया-जाणाऱयांना सावली देणारी, त्यांच्या अंगाखांद्यावर घरटी चिवचिवतात. वडाच्या लांबलचक केसांना-पारंब्यांना धरून पोरंपोरी झोके घेतात. बायाबापडय़ा दोरे बांधून पूजाबिजा पण करतात. संध्याकाळी त्याच्या पारावर बसून म्हाताऱया गप्पा रंगतात… गजाली होतात. गावातली वर्तमानपत्रंच त्या पारावर छापली न् वाचली जातात! खूप प्रसंगांची साक्षीदार ही झाडे. फळं-फुलं, सावली देताना वठून गेल्यावरपण चुलीसाठी स्वतःची लाकडं सरपण म्हणून देताना त्यांना धन्यच वाटत असावं… घराच्या वाशापासून चुलीतल्या सरपणापर्यंत, पाळण्याच्या लाकडापासून चितेच्या लाकडापर्यंतची त्यांची सोबत…!
केळ आणि माड यांना तर मानाचं पान. केळीच्या हिरव्यागार पानावर जेवण म्हणजे पंचेंद्रियांची तृप्ती! पूजेसाठी केळीचे खांब, लग्न, सत्यनारायण असो वा सीमांतपूजन वा गृहप्रवेशाचा समारंभ, केळीशिवाय पान हलत नाही!
तेच नारळाचं… याचा प्रत्येक कण न् कण मनुष्यदेहासाठी अर्पण! नारळाच्या झावळय़ा खूप आधी झोपडीवर… त्याआधी लज्जारक्षणार्थ. नारळाच्या शेंडय़ा घासणीसाठी, करवंटय़ा ओगराळय़ासाठी, त्याच करवंटय़ांचे दिवे, शोभेच्या वस्तू… तर बुंधा कापून शेतात पाणी देण्याचा नैसर्गिक पाणवठा. नारळाशिवाय पूजा नाही आणि खोबऱयाशिवाय कालवण नाही! आईच्या दुधाइतपंच शुद्ध अपार सत्त्व असलेलं नारळपाणी. निसर्गानं हे इतपं पॅकबंद केलंय की, त्यात जीवजंतू जाणं अशक्यच…
निसर्गानं जी ही जैविक साखळी बनवून ठेवलीय ती ज्या ज्या वेळी मानवानं तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा फार मोठय़ा आपत्ती ओढवल्यात. साखळीची एक जरी कडी तुटली तरी निसर्गाचा समतोल बिघडतो. एक दुसऱयावर अवलंबून. उंदीर पिकाचा नाश करतो. त्यासाठी त्यानं नागाची योजना केली. त्या नागानं जास्त ऊतमात करू नये यासाठी मुंगूस, ससाणा यांची योजना केली. आता उंदीर, नाग, पक्षी, वाघ-सिंह या सर्वांनाच पुरून उरणारा माणूस त्याच्यावर वरचष्मा ठेवायला कुणीच ठेवलं नाही! (कुणी म्हणेल – बायको हा प्राणी निर्माण केलाय की. तर तसं नाही. माणूसच माणसाचा नाश करण्याची बुद्धी ठेवतो हाही एक निसर्गाचा छुपा भात्यातला बाणच!)
युद्ध जनावरांमध्ये, पक्ष्यांमध्येही खेळली जातात. वर्चस्व पिंवा मादीसाठी! पण माणसांची युद्धं जास्त घातक. झाडांमध्ये अशा लढाया नसतात. बिचारे एका ठिकाणाहून दुसरीकडे हलू शकत नाहीत. पण त्यांच्यामध्ये पण निसर्गानं अनेक चमत्कार दडवून ठेवलेत. घटपर्णी ही वनस्पती. त्यातल्या मंद सुगंधी द्रावामुळे कीटक जाताच या वनस्पतींचं झाकण बंद होतं. कीटक द्रावात रुतून मरून जातो आणि मग त्याच्या शरीराचं विघटन करून ही वनस्पती वाढते. काहींची पानं दातेरी असतात. विषाचे कोटच. हीही कीटक खाऊन जगते.
खूप वर्षांपूर्वी वासू मेंधळे नावाचे अवलिया ‘विचित्र विश्व’ नावाचे मासिक काढायचे. त्यात अद्भुत नवलाईच्या गोष्टी असत. आफ्रिकेत अशी झाडे आहेत की, हवा आली की सळसळण्याचा आवाज माणसाच्या हसण्यासारखा येतो. तर काही झाडांमध्ये इतपं पाणी असतं की, फांदी तोडल्यावर नळासारखी जाड पाण्याची धार लागते.
पुराणात ‘संजीवनी’…. ज्यानं लक्ष्मण जिवंत झाला, जी हनुमानानं पर्वतासकटच उचलून आणली… ती मात्र अजून मिळाली नाही. आजार वाढले, पण इतकी झाडांची जैवविविधता आपल्याकडे संपन्न असून पण अजून आपण चरकसंहितेवरच थांबलोय. खरं तर पॅन्सरसारख्या असाध्य भयानक रोगावर इलाज हेच निसर्गाचे डॉक्टर (वृक्षवल्ली) आम्हाला देतील, पण अभ्यासू विषयच नाहीत. भरभक्कम लाखो रुपयांच्या फिया खर्चून मेडिकल कॉलेज पिंवा परदेशात जातील, पण निसर्गाने विविध औषधोपचार योजना झाडं रोपटय़ांच्या रूपाने अमाप दिल्यात त्यांचा शोध आपण घेत नाही. चंद्रावर यान सोडायला करोडो रुपये खर्चू, पण शेजारच्या जंगलात पडून राहिलेल्या वनस्पतीत कोणकोणती औषधं मिळतील, जेणेकरून आपल्या गरीब जनतेला ती स्वस्तात उपलब्ध होऊन त्यांचे जीव वाचतील यासाठी आपण प्रयत्न करीत नाही. पाणी, झाडं यांचा आपल्याइतका अपव्यय कुणीच करीत नसेल. जे सहज उपलब्ध होतं त्याकडे taken for granted घेतलं जातं. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ असलं. निसर्गसंपत्तीला इतपं सहज घेऊ नये… नंतर पश्चात्तापाची वेळ येईल. जसं आयुष्यात असंच होतं… असं वाटतं, हे काय सहज मिळण्यासारखं आहे न् मग ते कधीच मिळत नाही!



























































