नाद-मराठी – नभी तिरंगी निशाण चढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

पंचाहत्तर वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र हिंदुस्थानचा तिरंगा ध्वज तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला आणि ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ देशातून कायमचा नाहीसा झाला. ब्रिटिश साम्राज्यावरचा ‘मावळता सूर्य’ पाहायला त्या उगवत्या सकाळी ब्रिटनचे प्रतिनिधी लॉर्ड माउन्टबेटन हजर होते. आपल्या स्वतंत्र देशाचे पहिले गव्हर्नर जनरल झालेल्या माउन्टबेटन यांना तिरंग्याला ‘सॅल्यूट’ करावा लागला आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचं, योगदानाचं सार्थक झालं.

‘नाद-मराठी’मध्ये यावेळी महेंद्र कपूर यांची निवड करण्याचं कारण म्हणजे अनेक देशभक्तीपर गीतं त्यांनी हिंदीत जशी स्वरबद्ध केली आहेत तशीच मराठीतही केली आहेत. सुरुवातीला लिहिलेल्या गीताच्या ओळी कविवर्य जगदीश खेबुडकर यांच्या असून ‘हीच खरी दौलत’ या चित्रपटातल्या या गाण्याला राम-लक्ष्मण यांचं संगीत आहे आणि आवाज महेंद्र कपूर तसंच उत्तरा केळकर यांचा आहे.

महेंद्र कपूर हे नाव हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड गाजलं ते त्यांच्या  ‘उपकार’ चित्रपटातल्या ‘मेरे देश की धर्ती, सोना उगले, उगले हिरे मोती’ या गीताने. परंतु त्यांची कारकीर्द त्यापूर्वी कितीतरी आधीच बहरली होती. 1934 मध्ये अमृतसर येथे जन्मलेल्या या पंजाबी तरुणाने योग्य वेळी उत्कर्षासाठी मुंबई गाठली. अगदी बालपणापासूनच ते महंमद रफी यांच्या आवाजाने प्रभावीत झाले होते. त्यांच्या स्वरसाधनेला घरातून पाठिंबा असल्याने त्यांनी पं. हुस्नलाल, पं. जगन्नाथ बुवा, उस्ताद अब्दुल रहमान आणि पं. तुळसीदास शर्मा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं. या संगीत साधनेतून स्वराविष्काराचा पाया मजबूत केला की पुढे कोणतंही गाणं सोपं जातं हा अनेक गायकांचा अनुभव होताच. ‘पैसी हंसी आज, बहाले की रात’ हे गाणं गुरू मानलेल्या रफी साहेबांसमवेत गाताना त्यांना आनंद झाला.

आपले मराठमोळे संगीतकार अण्णा चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र यांनी शांतारामबापूंच्या ‘नवरंग’ चित्रपटाला अप्रतिम संगीत दिलं आणि त्यातली ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘शामल शामल बरन’ ही अवीट गोडीची गाणी महेंद्र कपूर यांच्याच स्वरातली. नंतरच्या काळात हिंदीमध्ये गुमराह, वक्त, हमराज, उपकार अशा कितीतरी चित्रपटांमधून त्यांचा स्वर रसिकांच्या मनात गुंजत राहिला. कधीकाळी त्यानी ‘बोनी एम’ कंपनीच्या ‘हुर्रे हुर्रे’चं ‘चोरी चोरी चलो’ अशी गीतं रेकॉर्ड केली. बोनी एमसाठी काम करणारे ते बहुधा पहिलेच हिंदी गायक.

महेंद्र कपूर यांचं मराठी गाण्यातलं स्थानही मोठं आहे. त्यांची सगळीच गाणी रसिकांना आजही चांगली आठवतात. भावगीतं, सिनेगीतं असे अनेक गानप्रकार त्यांनी स्वरबद्ध स्वरमंडीत केले.  ‘वैभव’ चित्रपटातील ‘अबोल झालीस का साजणे’ या त्यांच्या गीताचं संगीत राम कदम यांचं होतं. ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटातील दादा कोंडके यांचं ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदानं’ हे गाणं राम-लक्ष्मण यांनी संगीत दिलेलं आहे. ‘संत-निवृत्ती-ज्ञानदेव’ या सिनेमासाठी ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेलं आणि सी. रामचंद्र यांचं संगीत असलेलं ‘काय करू मी ते सांगा अगा पांडुरंगा’ हे आर्त स्वरातलं गीतही महेंद्र कपूर यांचंच. ‘मामा भाचे’ चित्रपटात त्यानी जगदीश खेबुडकर यांचं आणि एन. दत्ता (नाईक) यांनी संगीत दिलेलं ‘धुंद ही हवा जरी’ हे गाणं उषा मंगेशकर यांच्यासमवेत गायलं. याच एन. दत्ता यांचं संगीत काशीनाथ घाणेकर हीरो असलेल्या ‘मधुचंद्र’ चित्रपटाला होतं. त्यातली गदिमांची सगळीच गाणी नेहमीप्रमाणेच गाजली. त्यापैकी ‘झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा’ हे गाणं जरूर ऐका. जगण्यासाठीचं तत्त्वज्ञान त्या चार कडव्यात आढळेल. याच चित्रपटातलं ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी’ हे गाणं तर तुम्ही विसरणारच नाही. विशेष म्हणजे महेंद्र कपूर यांच्या बहुतेक सिनेगीतांचे संगीत दत्ता नाईक किंवा एन. दत्ता यांचं आहे. आता हेच पहा ना, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, संगीत एन. दत्ता आणि गाणं ‘धुंदीत राहू मस्तीत गाऊ’ असं यात महेंद्र कपूर यांच्यासह आशाताईंचाही सुस्वर आहे. ‘अपराध’ चित्रपटात. मधुसूदन कालेलकर यांचं ‘सूर तेच छेडिता’ हे गाणं त्यांनी एन. दत्ता यांच्याच संगीत दिग्दर्शनाखाली गायलं अशी अनेक गाणी सांगता येतील.

महेंद्र कपूर यांची देशभक्तिपर मराठी गाजलेली गाणी… ‘जिंकू किंवा मरू’ (गदिमा-वसंत देसाई – छोटा जवान), ‘स्वातंत्र्याची घुमे तुतारी’ (वंदना विटणक – संगीत प्रभाकर पंडित). ‘शेवटचा मालुसरा’ या चित्रपटातील अतिशय स्फूर्तिदायी गीताने लेखाचा शेवट करूया. गीत – जगदीश खेबुडकर, संगीत – दत्ता डावजेकर आणि स्वर महेंद्र कपूर यांचा!

हे भारतीयांनो ऐका, बलिदान कथा वीरांच्या; झुंजता निमाले दीप सागरात अंधाराच्या।

त्या चिरंजीव आत्म्यांनी त्या ज्वलंत इतिहासाची, रक्ताने लिहिली गाथा

ही तुमची भारतमाता, ही माझी भारतमाता, जय जवान, जय किसन

… आणि आता स्वातंत्र्याचा नव्या अमृतमहोत्सवी पर्वात ‘जय विज्ञान’सुद्धा!