एटीएम कार्डची अदलाबदल करून करायचा फसवणूक, 130 एटीएम कार्ड हस्तगत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्यांना बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डची अदलाबदली करणाऱयाला पवई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. तुफेल अहमद मिया सिद्धीकी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 130 एटीएम कार्ड हस्तगत केली आहेत.

पवई येथे राहणारा तरुण हा गेल्या आठवडय़ात एका बँकेच्या साकीविहार येथील एटीएममध्ये गेला होता. तो पैसे काढत असतानाच तुफेल तेथे आला. तुफेलने तरुणाला बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर तुफेलने तरुणाच्या कार्डमधून 59 हजार रुपये काढले. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच तरुणाने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक बुधन सावंत याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विनोद पाटील, टिळेकर, झेंडे, जाधव, सुरवाडे, पुरी, राठोड यांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये तुफेल दिसला. तुफेलवर घाटकोपर येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तीन दिवस साकीनाका परिसरात फिल्डिंग लावून तुफेलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध बँकांचे 130 एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. तुफेल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सात पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून त्याने गोरेगाव आणि सांताक्रुझ परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.