
ओबीसी आरक्षणासंदर्भातील बांठिया आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण निकालाआधी जाहीर झालेल्या निवडणुका या आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. हे निर्देश मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुढील पाच आठवडय़ांसाठी ‘परिस्थिती जैसे थे ठेवावी’ असे निर्देश दिले. यामुळे यापूर्वी घोषित झालेल्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यातील 92 नगरपालिकांत ओबीसी आरक्षण मिळावे यासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आरक्षणाच्या मुद्दय़ावर विशेष खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश देत पुढील पाच आठवडे राज्यामधील आरक्षणासंदर्भातील स्थिती आता जशी आहे तशीच ठेवावी असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. अभय ओक, न्या. जे. बी. पारडीवाला यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. तुम्हाला निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणुकासंदर्भातील निर्देश ओबीसी आरक्षणासाठी मागे घेण्याची मुभा हवीय. हा अर्ज रिकॉलसाठीचा आहे. यावर चार ते सहा आठवडय़ांनंतर सुनावणी केली जाईल, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.
निवडणुका होणार नाहीत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मी फोनद्वारे घेतली आहे. आपण 94 नगरपालिकांत ओबीसी आरक्षण मिळावे, तत्काळ निवडणुका लावाव्यात तसेच न्यायालयाने यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात तत्काळ सुनावणी घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगितले आहे. याच कारणामुळे आरक्षणासंदर्भातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता या निवडणुका होऊ शकत नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
























































