
पंजाब येथील संशयित दहशतवाद्यास शिर्डीतून जेरबंद केल्यानंतर देशातील नंबर 2चे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साई मंदिराची सुरक्षा यंत्रणा ‘हाय अलर्ट’ करण्यात आली आहे. जगभरातून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱया प्रत्येक साईभक्ताची सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या साई मंदिर सुरक्षा यंत्रणेचे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी पंजाब येथील एका घटनेतील दहशतवाद्यास शिर्डीतून एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षकाच्या गाडीला आयईडी लावून जीवे मारण्याच्या कटात हा दहशतवादी सामील होता. राजेंद्र कुमार असे या दहशतवाद्याचे नाव समोर आले होते. राजेंद्र साईदर्शनासाठी जाणार होता, अशी माहितीदेखील शिर्डीचे विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली होती. त्यातच शिर्डी साई मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने अगोदरच सांगितले आहे.
त्या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थानने आपली सुरक्षा यंत्रणा ‘अलर्ट’ केली असून, पोलीस प्रशासनदेखील ‘अलर्ट मोड’वर आहे. शिर्डी शहरातील सर्व हॉटेलमालक व चालक यांना शिर्डी पोलिसांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. शिर्डी येथील जगप्रसिद्ध श्री साई मंदिराची सुरक्षा यंत्रणा पहिल्यापासून सतर्क होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क केली असून, काळजी घेण्यात येत असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
‘स्मार्ट सिटी’च्या सीसीटीव्हींना मुहूर्त मिळेना
श्री साई मंदिरात, तसेच मंदिर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच पाचही प्रवेशद्वारांवर बॅग स्कॅनर, ‘क्यूआरटी’ जवान, पोलिसांचा मोठा फौजफाटा यांसह अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे. शहरातदेखील काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आल्या असल्या, तरी केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत पूर्ण शिर्डी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते. मात्र, या योजनेला अद्यापि मुहूर्त सापडत नसल्याने साईभक्तांच्या सुरक्षेसाठी श्री साई संस्थान प्रशासनाच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी साईभक्त, तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




















































