
पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी एकावर कोयत्याने सपासप वार करीत खूनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि.23) रात्री भवानी पेठेतील जुन्या मोटार स्टँडजवळ घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
रेहान बागवान, रशीद कुरेशी, आरिफ शेख, मुख्तार पठाण, अल्ताफ शेख यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मारहाणीत अहमद वाहीद शेख (वय 28) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद व आरोपींमध्ये जुने वाद आहेत. मगळवरी रात्री साडेबाराच्या सुमारास अहमद हा त्याच्या इतर मित्रांसोबत भवानी पेठेतील स्टँड जवळ गप्पा मारत बसला होता. त्यावेळी टोळक्याने हातात कोयते व पालघन घेऊन अहमदवर हल्ला केला. त्यानंतर परिसरात दहशत माजवत तुफान गोंधळ घातला. टोळक्याने अचानक घातलेल्या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान मारहाण करणारे काही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर, मारहाण झालेला अहमद देखील रेकॉर्डवरील आहे. पुढील तपास खडक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे करत आहेत.


























































