‘लालपरी’ झाली हायटेक ! एसटीत पाच हजार ॲण्ड्राईड तिकीट मशीन्स दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाने प्रवाशांना सर्व प्रकारच्या पेमेंट मोडद्वारे डीजिटल तिकीट खरेदी करण्यासाठी तब्बल पाच हजार ‘ॲण्ड्राईड’ तिकिट मशिन्स सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

मे. ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर इंडिया लि., मे. पाईनलॅब व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने या तिकिट मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते या मशिन्सचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यस्थापक मनोजकुमार सिन्हा, सहायक महाव्यवस्थापक राजा कुंदन शरण, एसटी महामंडळाचे विविध विभागांचे महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शेखर चन्ने म्हणाले, की सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे, या नव्या मशिन्समुळे प्रवाशांना तिकिट काढण्यासाठी युपीआय, क्युआर कोड आदी डीजिटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध होतील, त्यासाठी पाच हजार ॲण्ड्राईड तंत्रज्ञानाच्या मशिन्सचा समावेश केला आहे. या नव्या मशिन पहिल्या टप्प्यात अकोला, लातूर, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर व भंडारा या विभागांना वितरीत करण्यात आल्या आहेत.