
बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात असलेल्या राखेच्या तळ्यात जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार, 26 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राखेचा अवैध उपसा करण्यासाठी हा प्रकार केला असावा, असे दिसून येत आहे. मारोती काचगुंडे, हरिश्चंद्र तुकाराम जाधव आणि बालाजी लालू चव्हाण या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 286 सहकलम 3,भारताचा स्फोटक पदार्थ बाबत अधिनियम 1908 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठवाड्यात एकमेव असलेले परळीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्र नेहमीच राखेच्या प्रदूषणामुळे चर्चेत राहिलेले आहे. अतिसंवेदनशील राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून परळी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांकडून केले जाणारे दुर्लक्ष तसेच केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतूक करण्यासाठी अनेक नियमाची केलेली पायमल्ली यामुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लाखो झाडांची कत्तल करत गेल्या 30 वर्षांपासून साठवलेल्या राखेचा उपसा राख माफियांकडून करण्यात आला, मात्र शुक्रवारी राख माफियांनी चक्क महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळ असलेल्या राखेच्या तळ्यात स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून जिलेटीनच्या 103 कांड्या 150 तोटे, बॅटरी, वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा असते, अशी माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि मारोती मुंडे यांनी दिली.































































