बी पॉझिटिव्ह : शब्देविण संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शब्देविण संवादू म्हणतात ना तसंच माझा आणि बाप्पाचा एक वेगळा संवाद चालू असतो आणि त्याने मला एक प्रेरणा मिळते. खात्री मिळते की तो माझ्यासोबत आहे…! सांगतोय प्रसिद्ध संगीतकार नीलेश मोहरीर.

काही काही नाती ही शब्दात मांडता येत नाहीत. माझं आणि बाप्पाचं नातंसुद्धा असंच आहे. शब्दात मांडता न येणारं. अगदी नकळत्या वयापासूनच तो माझा जिवाभावाचा सखा कधी झाला हे मलाही कळलं नाही. मला आठवतं, लहानपणी दंगामस्ती केली की गणपती बाप्पा शिक्षा देईल अशी मोठी माणसं म्हणायची. तेव्हासुद्धा त्याच्याविषयी भीती कधीच वाटली नाही. इतका मस्त देखणा दिसणारा, सर्वांची काळजी घेणारा बाप्पा कशाला शिक्षा देईल असंच वाटायचं. पुढे जसजसं कळत गेलं, तसतसं मी बाप्पाच्या अधिक जवळ जायला लागलो. अजूनही जातोय आणि हा अनुबंध कायम राहणार आहे.

मी आजपर्यंत कधीही काहीही मागितलं नाही त्याच्याकडे आणि त्याने न मागता मला पुष्कळ काही दिलं आहे.

छंद शास्त्राची देवता म्हणजेच गणपती, बुद्धीची देवता म्हणजे गणपती, 64 कलांचा अधिपती म्हणजे गणपती!

 नाव घेता क्षणी आपल्याला प्रसन्न वाटतं. दर्शन मात्रे मनकामना पुरती… केवळ त्याच्या दर्शनाने आपल्या साऱया इच्छा पूर्ण होतात असा हा गणपती मला आशेचा देवता वाटतो.

आमच्या घरातल्या देवघरात चांदीचा बाप्पा आहे. पिढीजात असलेली ही मूर्ती फारच प्रसन्न आहे. घराबाहेर पडताना घरातल्यांचा निरोप घेण्यासोबत मी त्याचंही दर्शन घेऊनच बाहेर पडतो. देवघराव्यतिरिक्त घरात बाप्पाच्या निवडक देखण्या मूर्ती आहेत. मला वेगवेगळ्या मूर्ती जमवायला खूप आवडतं.

 पुष्कळदा असं होतं की, एखादा प्रोजेक्ट मनासारखा होत नाही किंवा प्रचंड मेहनत करूनसुद्धा त्या प्रोजेक्टला यश नाही मिळत. चित्रपट चांगला चालतो, पण त्यातली गाणी लवकर हिट होत नाही. असे बरेच चढ-उतार येत राहतात अशा वेळेला मला नर्व्हस व्हायला होतं. किंचित मन कमकुवत होतं. मनात वाटत राहतं की, अरे, इतकी मेहनत करूनही असं का घडलं असावं? मन खट्टू होतं. प्रत्येक गाण्याचं स्वतःचं नशीब असतं हे मान्य. मेहनतीच चीज झालं नाही की एक कलाकार म्हणून तर वाईट वाटतं. पण माणूस म्हणूनही वाईट वाटतं. डोळे बंद करून मी बाप्पाशी संवाद साधतो.

 शब्देविण संवादू म्हणतात ना तसंच आमचा एक वेगळा संवाद चालू असतो आणि त्याने मला एक प्रेरणा मिळते. खात्री मिळते की तो माझ्यासोबत आहे. अशीच मेहनत जिद्द, चिकाटी पुढच्या कामात दाखव, नक्कीच यशस्वी होशील. याची प्रचीती मला नुकतीच आली. ती म्हणजे सागरिकाच्या यूटय़ुब चॅनेलला ‘गणपतीचे नाव आधी’ आणि ‘माझ्या गणाला’ ही दोन मी संगीतबद्ध केलेली गाणी नुकतीच रिलीज झाली आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे केवळ चोवीस तासांमध्ये दोन्ही गाण्यांना पन्नास हजारांपेक्षा जास्त ह्यूज मिळाले. मला खात्री आहे की आतापर्यंतच्या प्रवासात जसं बाप्पाने माझ्याकडून काम करवून घेतलं तसंच हे कामसुध्दा बाप्पानेच करवून घेतलं. पुढच्या कारकिर्दीमध्ये आणि वैयक्तिक जीवनातल्या वाटचालीमध्ये बाप्पा सोबत होता, आहे आणि असणार आहे ही भावनाच मनाला उभारी देते. पुन्हा नव्या जोमाने, नवी उमेद पंखात घेऊन उंच झेप घेण्याची जिद्द देते.

शब्दांकन: निनाद पाटील