
बारावीच्या निकालात 6.4 टक्क्यांची वाढ लातूर, संभाजीनगर विभागाची चांगली कामगिरी
दहावी-बारावी फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. दहावीचा निकाल 30.47 टक्के तर बारावीचा एकूण निकाल 32.27 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या 7 हजार 643 विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळाली असून ते अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत, तर बारावीच्या निकालात यंदा तब्बल 6.4 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे.
दहावीत लातूर विभागाचा सर्वाधिक 51.74 तर बारावीत संभाजीनगर विभागाचा निकाल 48 टक्के लागला आहे. यंदा लातूर, संभाजीनगर आणि नागपूर विभागाची कामगिरी चांगली झाली असून या विभागातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील 19,42 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांपैकी एकूण 5 हजार 803 विद्यार्थी पास झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल 1.33 टक्क्यांनी वाढला आहे. बारावीच्या परीक्षेला 53 हजार 547 विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी 17 हजार 281 विद्यार्थी पास झाले आहेत. निकालाची टक्केवारी 32.27 इतकी आहे.
मुंबईच्या निकालात भरघोस वाढ
फेरपरीक्षेत मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईचा बारावीचा निकाल तब्बल 16.24 टक्क्यांनी वाढला आहे. दहावीच्या निकालातही 1.89 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई विभागातून 7 हजार 218 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यापैकी 1 हजार 633 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावीच्या 24 हजार 989 विद्यार्थ्यांपैकी 7 हजार 823 विद्यार्थी पास झाले आहेत.
विभागनिहाय टक्केवारी
(दहावी)
लातूर 51.74
नागपूर 45.65
संभाजीनगर 39.76
अमरावती 39.63
नाशिक 39.13
कोकण 35.59
कोल्हापूर 32.84
पुणे 24.73
मुंबई 22.62
(बारावी)
संभाजीनगर 48
लातूर 42.88
नागपूर 39.13
अमरावती 34.55
मुंबई 31.30
नाशिक 31.08
कोल्हापूर 29.70
पुणे 29.09
कोकण 25.66




























































