
>> स्वरा सावंत
गेल्या काही वर्षांत पश्चिम घाटातील खाणकामे, उत्खनन, वृक्षतोड, जंगलाचा विनाश, अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे, रस्ते विकास प्रकल्प, चोरटय़ा शिकारी, तस्करी आणि अनियंत्रित पर्यटनामुळे पश्चिम घाटाचे आणि तेथील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पश्चिम घाटात आज अवघे 37 टक्के वन क्षेत्र शिल्लक राहिले आहे. यामुळेच तेथील पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षण-संवर्धनासाठी संवेदनशील क्षेत्राची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील तालुके इको सेंसिटिव्ह झोन म्हणून जाहीर झाले. याबाबत असलेल्या अनेक गैरसमजामुळे या संवेदनशील क्षेत्राला समजून घेण्याची गरज असून यासाठी दोडामार्ग तालुक्यात घुंगुरकाठी संस्था जनजागृतीचे काम करत आहे.
पेंद्र सरकारच्या वन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने 6 जुलै 22 रोजी प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील गावांच्या अधिसूचनेच्या मसुद्यात संपूर्ण दोडामार्ग तालुका यातून वगळण्यात आला आहे. दोडामार्ग तालुका हा जैवविविधता व पर्यावरणदृष्टय़ा अतिशय समृद्ध आहे. परंतु या भागात खाणकाम तसेच डोंगरदऱयांमध्ये जंगलतोड करून रबर, अननस वगैरे एकाच प्रकारच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जात आहे. यामुळे या भागातील जैवविविधता प्राण्यांचा अधिवास आणि एपंदरच पर्यावरण धोक्यात आले आहे. हे जपण्यासाठी हा भाग पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र जाहीर होणे आवश्यक आहे अन्यथा हा संपूर्ण भाग खाणमाफियांना आंदण दिल्यासारखे होईल.
यासंदर्भात आतापर्यंत पाच अधिसूचना जाहीर करून केंद्र सरकारने या महत्त्वपूर्ण विषयाचा खेळखंडोबा केला आहे. पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र (Ecologically Sensitive Area ESA) याबाबत काही गैरसमज पसरले गेले आहेत. रस्ते बांधले जाणार नाहीत, घरे बांधता येणार नाहीत, घरांची दुरुस्ती करता येणार नाही, चिरेखाणी बंद होतील, कोणताही उद्योगधंदा करता येणार नाही, अशा प्रकारचे हे गैरसमज असल्याने पर्यावरणाचे रक्षण करण्यासंदर्भात स्थानिकांमध्ये उदासीन भूमिका आहे. मात्र प्रत्यक्षात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्यावर काही निर्बंध जरूर येतील. परंतु त्यामुळे स्थानिक जनजीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट त्यांचा परिसर, पर्यावरण, वृक्षराजी, निसर्ग, जलखत यांचे संवर्धनच होणार आहे.
काय खरे काय खोटे?
शासनाच्या परवानगीशिवाय जमीन उत्खनन, खाण उत्खनन करता येणार नाही. त्यामुळे डोंगर पोखरणे, मायनिंग, क्रशरसारखे विघातक प्रकल्प करता येणार नाहीत. गौणखनिज म्हणजे चिरेखाणी सुरू राहतील. याचा फायदा हा कळणे, रेडीसारख्या गावांची मायनिंगमुळे झालेली दुर्दशा इतर गावांची होणार नाही. जंगलतोड वाचेल. जंगली प्राण्यांना अभय मिळेल. जैवविविधतेचा ऱहास होण्यापासून सुटका मिळेल.
ईएसएनमध्ये येणाऱया भागात वाळू उत्खनन करता येणार नाही. स्थानिक गरजेपुरते परवानगी घेऊन गौण खनिज काढता येते. यामुळे अवैधरीत्या वाळू उत्खनन थांबेल. नदीचे पात्र वाढल्यामुळे शेतीची, लोकांच्या जमिनीची होणारी धूप वाचेल, तसेच अचानक येणारे पूरही थांबतील.
जंगलतोड करता येणार नाही. दोडामार्गसारख्या भागात केरळीयन लोकांची चाललेली दादागिरी, अवैध धंदे, जमिनीच्या अवैध खरेदी-विक्रीला चाप बसेल. रबरसाठी नियमबाह्य होणाऱया जंगलतोडीलाही लगाम राहील.
रेड पॅटेगरीमधील प्रकल्प, उद्योग पिंवा जैवविविधतेला बाधा आणणारे प्रदूषणकारी प्रकल्प उभारता येणार नाहीत.
औष्णिक प्रकल्प आणता येणार नाहीत, जलविद्युत प्रकल्प नियमानुसार बनतील
20,000 चौ. मीटरपर्यंत बांधकाम तसेच नवीन घराचे बांधकाम, दुरुस्ती, वाढीव काम, मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल करता येईल.
प्रदूषणविरहीत उद्योग, बूट-चपला, रेडिमेड लेदर उद्योग, हॉर्टीकल्चर, फ्लोरिकल्चर (प्रोन हाऊस), कृषी आधारीत उद्योग, लघु उद्योग यांना परवानगी असेल, नगरपालिका, नगरपंचायत विभाग सोडल्यास मोठे डेअरी, कुक्कुटपालन, अळंबी उत्पादन आणि निसर्गपुरक प्रकल्प चालतील.
नवीन पर्यटन प्रकल्प झोनल मास्टरप्लान अनुसरून राबवता येतील, असे प्लान इको सेंसिटिव्ह विभागाच्या क्षेत्राच्या क्षमतेवर अवलंबून असतील व त्यांना राज्य शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयालाकडून परवानगी लागेल.
नैसर्गिक वारसा या झोनमुळे मिळालेली जंगले. हजारो वर्षांच्या निसर्गाच्या उलथापालथीमुळे निर्माण झालेली रॉक फॉर्मेशन, अभ्यास सहल, जंगल सफारी आयोजित करून नैसर्गिक बदलांमुळे त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी योजना इको सेंसिटिव्ह झोनच्या क्षेत्रीय मास्टर प्लानमध्ये समाविष्ट केल्या जातील. अशा परिसरात पर्यटन विकास बांधकामासाठी उपक्रमांसाठी राज्य सरकारद्वारे मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येतील. यामुळे पर्यटन क्षेत्राला कोणतीही बाधा येणार नाही.
इको सेंसिटिव्हबाबत अनेक संभ्रम व वादंग निर्माण केले गेले आहेत. दोडामार्ग तालुका सर्वात जास्त वन क्षेत्राने आच्छादित तालुका असतानादेखील इको सेंसिटिव्ह भागांत संरक्षित करण्यात आला नाही. यामागे केरळीयन रबरलॉबी, मायनिंग लॉबी, सॉ-मिल लाकूडतोड व्यापारी लॉबी अशांचे लागेबांधे असावेत. पण याविरुद्ध हायकोर्टाने आदेश काढला आणि हा तालुका व इकोसेंसिटिव्ह म्हणून संरक्षित झाला. दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तालुक्यांवर मॅगेनीज, आयर्न, बॉक्साईट आदी खाणकामांचा धोका आहे. इको सेंसिटिव्ह झोन होण्याबाबत अनेकांनी विरुद्ध भूमिका घेतली. यामुळे तालुकावासीय अजून संभ्रमात पडत आहेत. म्हणूनच ऑक्टोबर 2018च्या इको सेंसिटिव्हबाबतच्या शासकीय राजपत्रानुसार आणि महाबळेश्वर – पाचगणी येथील इको सेंसिटिक अध्यादेशाची माहिती लोकांना होणे गरजेचे आहे.
– सतीश लळीत, घुंगुरकाठी स्वयंसेवी संस्था, सिंधुदुर्ग




























































