
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच अकरावी प्रवेशाची संधी मिळणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नाशिक आणि नागपूर या पाच महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱया ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेदरम्यान दुसऱया विशेष फेरीत फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. तर उर्वरित ठिकाणी हे प्रवेश संबंधित महाविद्यालयात असलेल्या रिक्त जागांनुसार केले जाणार आहेत.
फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज भरण्याच्या सर्व प्रक्रिया आणि त्यासाठीची माहिती अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी जाहीर झाला. या परीक्षेत मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातून 5 हजार 803 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुंबई विभागातील 1 हजार 633 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी संपादन केलेल्या गुणवत्तेनुसार पसंतीच्या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र यामध्ये मुंबई विभागात फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हे त्यांच्या गुणवत्तेनुसारच दिले जाणार असून त्यासाठी राबवण्यात येत असलेल्या दुसऱया विशेष फेरीदरम्यान त्यांना अकरावीचे प्रवेशासाठी भाग-1 आणि भाग-2 यासाठी नोंदणी करता येणार आहे.
सर्व विषयांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच एटीकेटी मिळालेल्या 7 हजार 643 विद्यार्थ्यांनादेखील अकरावी प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. मुंबईमध्ये अकरावीच्या खूप मोठय़ा प्रमाणात जागा रिक्त राहतात. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी
दहावीच्या फेरपरीक्षेला एकूण 20 हजार 517 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्षात 19 हजार 42 विद्यार्थी परीक्षेला बसले हाते. त्यातून केवळ 5 हजार 803 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात मुंबई विभागात 7 हजार 619 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 7 हजार 218 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यातून केवळ 1 हजार 633 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.





























































