
बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत 899 खड्डे बुजवले आहेत तर 1 एप्रिल ते 4 सप्टेंबरपर्यंत अशा गेल्या महिन्यांत 29 हजार 900 खड्डे बुजवले, असे पालिका प्रशासनाने सांगितले.
मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट क्राॅकिटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने जोर दिला आहे. यासाठी 5 हजार 800 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होते. बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करा, अशी मागणी जोर धरु लागली होती.
त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्युरिंग काँक्रिट, रॅपिड क्युरिंग अस्फाल्टचा वापर करण्यावर रस्ते विभागाने जोर दिला आहे. दरम्यान, 1 एप्रिल ते 4 सप्टेंबरपर्यंत 29 हजार 900 खड्डे बुजवले. यात 24 हजार 370 खड्डे कोल्ड मिक्स आणि अस्फाल्टचा वापर करून बुजवण्यात आले, असे पालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.




























































