जादू अन् सायफाय सिनेमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायन्स बेस्ड सिनेमे बघताना अधिकच रंजक होत जातात. या जॉनरमुळेच तरुण, प्रेक्षकवर्ग या सिनेमांना अधिक असतो. विज्ञानकथा, त्यातून साकारण्यात आलेली काल्पनिक पात्रं रिऍलिस्टीक पात्रांपेक्षा मोठा गल्ला जमवताना गेल्या काही दशकात आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे जादू… तुमच्या आमच्यात खूप चर्चिला गेलेल्या या जादूला आपण रोशन्सच्या होम प्रोडक्शन असलेल्या ‘कोई मिल गया’मध्ये पाहिलंय… हिंदुस्थानी सिनेसृष्टीतला हा काही पहिला एलियन नाही. या आधीही अनेक एलियन अर्थात विज्ञान आणि काल्पनिक कॅरेक्टर्सला हिंदुस्थान तिकीटबारीवर प्रेक्षक आणि गल्ला दोन्हीही खेचता आला आहे. यापैकी काही सिनेमांचा घेतलेला हा आढावा.

कालाई अरासी (1963)
हिंदुस्थानच्या सिनेसृष्टीत पहिला एलियन बनवण्याचा मान ‘कालाई अरासी’ या सिनेमाला मिळाला. 1963 साली तामीळ भाषेत आलेल्या या विज्ञानकथा असलेल्या सिनेमाने एक बहुआयामी प्रेक्षकवर्ग तयार केला. परग्रहावर असणाऱया मनुष्यसदृश जीवसृष्टीला संगीत शिकवण्यासाठी हिंदुस्थानच्या धरतीवरून महिलेचे अपहरण केले जाते, अशी थीम घेऊन हा प्रयोग हाताळण्यात आला. ए कासीलिंगम यांचे दिग्दर्शन असलेला हा पहिला सिनेमा.

अंबुली (2012)
स्टीरिओस्कोपीक थ्रिलर असलेला हा पहिलाच सिनेमा असून थ्रीडीमध्ये रिलीज झालेला पहिला विज्ञान कथेतील सिनेमा म्हणून नावाजला गेला आहे. हरिश शंकर यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा तामीळ सिनेसृष्टीसाठी प्रयोगशील ठरला. 1970 च्या दशकातील ही कथा आर पार्थिवन, गोकुलनाथ, जगन यांच्या दरमार अभिनयाने रंगली आहे. तामीळनंतर हिंदी सिनेसृष्टीत ‘कालपुरुष’ या नावाने हा सिनेमा डब करण्यात आला.

मिस्टर एक्स इन बॉम्बे (1964)
लिजंड्री कलाकार किशोरकुमार यांनी 1964 साली आलेल्या ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’मध्ये अदृश्य माणसाची भूमिका केली. यातील किशोरदांबरोबरच कुमकुम आणि मदनपुरी यांचा दमदार अभिनय विसरता येणार नाही. शास्त्र्ाज्ञाच्या प्रयोगांवर आधारित असलेला हा सिनेमा चुकलेला प्रयोग आणि त्यामुळे झालेली जीवहानी या कथानकाभोवती फिरतो. हिंदी भाषेतील सायफाय सिनेमांमध्ये गणला जाणारा हा पहिला चित्रपट आहे.

कार्गो (2020)
कोरोना काळात चित्रपटसृष्टी बहुआयामी होत असताना नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘कार्गो’ हा सिनेमा तरुण प्रेक्षकवर्गात चांगलाच गाजला. बाह्य अवकाशात फिरणारे कथानक, प्रहस्थ नावाच्या राक्षसाच्या मृत्यूनंतर कसे स्पेसशिपवर काम करते, हे दाखवण्यात आले आहे.

पाताळघर (2003)
2000 च्या दशकात आलेल्या या सिनेमाने आता विज्ञान कथेला काल्पनिकसोबत मशिन्सची जोड दिली. एक शास्त्र्ाज्ञ अशी मशीन बनवतो जी कोणालाही झोपवू शकते. मात्र शास्त्र्ाज्ञाच्या मृत्यूनंतर मशीन हाताळताना उद्भवणाऱया समस्या, त्याचा होणारा गैरवापर आणि झोपी गेलेले एलियन जागे होऊन येणारे संकट अशा कथेमुळे सिनेमा अधिक रंगतदार झाला आहे. बंगाली सिनेसृष्टीने हिंदुस्थानी चित्रपटविश्वाला दिलेले हे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

श्री (2013)
बॉलीवूडमध्ये टाइम ट्रव्हल थीमवर आधारित हा सिनेमा आहे. यामध्ये एका मोठय़ा रकमेसाठी स्वतःवर प्रयोग करून घेणाऱया तरुणाची कथा आहे. प्रयोगानंतर तरुणावर शास्त्र्ाज्ञाचा खून तसेच प्रयोगाशी प्रतारणा केल्याचे आरोप होतात. त्याची निर्दोषत्व सिद्ध करताना झालेली टेक्निकल धडपड सिनेमातून दाखवण्यात आली आहे.

स्वरा सावंत