
दहशतवाद पसरवण्याच्या हेतूने कारवाया सुरू असल्याच्या कारणावरून आसाम येथे मुसलमानांनीच मदरसा पाडल्याची घटना घडली आहे.
आसाम येथील गोलपारा इथे ही घटना घडली आहे. येथील एका मदरशात दहशतवादी कारवाया सुरू असल्याची माहिती येथील मुस्लीम समुदायाला मिळाली होती. या मदरशात शिकवणाऱ्या एका शिक्षकावर अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. या शिक्षकाला पोलिसांनी अटक देखील केली.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी यापूर्वी दहशतवादी कारवाया सुरू असतील असे मदरसे राज्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अशा मदरशांवर आणि संबंधित घटकांवर नजर ठेवावी असं आवाहन जनतेला करण्यात आलं होतं.
यापूर्वीही असे तीन मदरसे पाडण्यात आले होते. मात्र, ती सरकारी कारवाई होती. यावेळी अशी जागरुकता दाखवून मुस्लीम समुदायानेच हा मदरसा पाडण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मुस्लीम समुदायानेच जेसीबीच्या साहाय्याने हा मदरसा पाडून टाकला.


























































