Mumbai Local Train मुसळधार पावसामुळे लोकलचा खोळंबा, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गुरुवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

मुंबईला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले आहे. दिवसभर उन आणि सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडत आहे. सायंकाळी काम संपवून घरी निघालेल्या चाकरमान्यांना पावसाचा तडाखा बसत असून लोकल सेवेवरही याचा परिणाम होतोय.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे तब्बल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. ठाणे-दिवा दरम्यान पाणी भरल्याचीही प्राथमिक माहिती मिळतेय.

टिटवाळा येथे मालगाडीत बिघाड झाला आहे. त्यामुळे आसनगाव-कसारा दिशेकडील लोकल खोळंबल्या आहेत, अशी माहिती कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे. दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेचा अभाव असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुक काहीशा उशीराने पण सुरळीत सुरु आहे.

हवामान खात्याकडून तीन दिवसांचा अलर्ट जारी

मुंबई-ठाण्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात 9 ते 11 सप्टेंबरपर्यंत जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवून कुलाबा वेधशाळेने ‘येलो अलर्ट’देखील जारी केला. बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढेल, असे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. याच अनुषंगाने मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत गुरुवारपासूनच अतिमुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचाही वेग वाढणार आहे. वारे ताशी जवळपास 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. यादरम्यान मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगरांत शुक्रवार ते रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.