देशातील अनेक राज्यात लंपी रोगाचं थैमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली लस बनवल्याची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत लंपी या रोगाने थैमान घातलं आहे. या रोगामुळे हजारो गायींचा मृ्त्यू झाला आहे. या रोगामुळे दूध उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रतिबंधक लस बनवल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

सोमवारी इंटरनॅशनल डेअरी फेडरेशनच्या वर्ल्ड डेअरी समिट या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये गुरांना लंपी विषाणूची लागण झाली आहे. हा आजार दूध उत्पादन क्षेत्रासाठीही एक मोठी समस्या बनत आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी लंपी या त्वचा विकारावर गुणकारी अशी स्वदेशी बनावटीची लस बनवली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

लंपी या त्वचा विकारामुळे देशातील अनेक राज्यांतील गुरांना जिवाचा धोका निर्माण झाला आहे. हा रोग डास, माश्या, गांधील माश्या यांमुळे तसंच, प्रदूषित अन्न, पाणी यांद्वारे फैलावतो. अनेक राज्यामध्ये गायींचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. राजस्थान सारख्या राज्यांत प्रतिदिन 3 ते 4 लाख लीटर कमी उत्पादन झालं आहे.