
प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत म्हणजे प्रयोगशील कलावंत… गायक, संगीतकार, गीतकार बनून नवनवीन प्रयोग करताना त्यांना आपण पाहिलंय, ऐकलंय. आता आणखी एका वेगळय़ा वाटेवरून त्या आपल्या भेटीला आल्या आहेत. वैशाली सामंत यांनी एका व्हिडीओ साँगची निर्मिती केली आहे. ‘सांग ना’ हे त्यांनी ‘ऐका प्रोडक्शन’तर्फे निर्मिती केलेले पहिले गाणे सोमवारी यूटय़ूबवर रिलीज झाले. काही तासांत त्याला लाखो ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याची निर्मिती म्हणजे एक वेगळी वाट… एक वेगळा अनुभव…अशा भावना वैशाली यांनी व्यक्त केल्या.
ऑफिसवाली लव्हस्टोरी
ऑफिसवाली लव्हस्टोरी अशी ‘सांग ना’ या गाण्याची थीम आहे. या गाण्यामधून कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱया दोघांची सुरेल गोष्ट मी सांगत आहे. त्यासाठी खऱयाखुऱया कॉर्पोरेट ऑफिसमध्ये शूटिंग करण्यात आले. त्यामुळे एक वेगळाच जिवंतपणा गाण्याला आला आहे, असे वैशाली म्हणाल्या.
‘सांग ना’ गाण्याच्या प्रवासाबद्दल वैशाली म्हणाल्या, हे गाणे गेली काही वर्षे माझ्या डोक्यात रुंजी घालत होतं. व्हिडीओ कसा असावा, त्यातील दृश्य कसे असावेत, हेदेखील मी ठरवले होतं. अगदी अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर या जोडीलाही मी निश्चित केलं होतं. गायिका म्हणून नॉन फिल्मी गाणे करताना आव्हान असते. हा प्रवास मी एन्जॉय केला असंच म्हणेन.
गायिका, निर्माती आणि अभिनय अशा तीनही जबाबदाऱया या गाण्यासाठी वैशालीने सांभाळल्या आहेत. ‘ऐका प्रोडक्शन’ची स्थापना अलीकडेच वैशालीने केली. या वेगळ्या वाटेवरबद्ल त्या म्हणाल्या, आधी सांगितल्याप्रमाणे ‘सांग ना’चा व्हिडीओ माझ्या डोक्यात एकदम फिट होता. त्यात टी-सीरिजने मला सांगितले की, तुम्हीच या गाण्याचा व्हिडीओ करा. मी म्हटलं चला प्रयत्न करूया. संगीतकार म्हणून माझी सुरुवात अशीच झाली होती. मला काय व्यक्त व्हायचंय हे संगीतकार म्हणून मला सांगता येतं. हे गाणं पडद्यावर दिसताना कसं दिसावं, याबद्दल माझं काही म्हणणं होतं. त्याची संधी मला मिळाली आणि मला वाटलं की मी हे करू शकेन, म्हणून मी हे केले.
‘सांग ना’ या व्हिडीओ साँगचे दिग्दर्शन राहुल खंदारे यांचे तर गीतकार-संगीतकार अश्विन भंडारे आहेत. अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांच्यावर गाणं चित्रित झाले असून ते रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.



























































