
शिवसेनेच्या अडचणीच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ देण्यासाठी बीडमधील निष्ठावंत शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यासाठी शिवतिर्थाकडे कूच केली. बीड ते शिवतीर्थ असा 500 कि.मी.चा प्रवास करण्यासाठी पायी निष्ठा यात्रा आज बीडमधून जल्लोषात रवाना झाली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा दाखवून दिंडीला प्रारंभ झाला.
शिवसेनेचा शिवतिर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा दणक्यात होणार आहे. शिवसैनिकांच्या जल्लोषाला सिमा राहिली नाही. या दसरा मेळाव्यासाठी बीडमधील माजी तालुकाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंत शिवसैनिकांची पायी निष्ठा यात्रेचे आयोजन करण्यात आले. बीड ते शिवतिर्थ हा प्रवास 21 दिवसात पूर्ण करणार आहेत. यासाठी शेकडो शिवसैनिक निष्ठा यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. 5 ऑक्टोबर रोजी निष्ठा यात्रा मुंबईत पोहचणार आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात झाली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख आप्पासााहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी निष्ठा यात्रेतील सहभागी शिवसैनिकांचा हृद्य सत्कार करून यात्रेला शुभेच्छा दिल्या.
ठिकठिकाणी हृद्य सत्कार आणि औक्षण
निष्ठा यात्रा सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रवाना झाली. रस्त्यात ठिकठिकाणी यात्रेत सहभागी शिवसैनिकांचा आणि आयोजक उल्हास गिराम यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. शिवसैनिकांचा जल्लोष सुरू होता. घोषणाबाजी, फटाक्याची आतिषबाजी सुरू होती. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी शिवसैनिकांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
20 दिवसाच्या मुक्कामाची आणि दिंडीतील शिवसैनिकांची प्रवासातील तयारी आधीच पूर्ण करण्यात आली. तर मुक्काम दर कोस करत निष्ठा यात्रा ५ ऑक्टोबर रोजी शिवतिर्थावर दाखल होणार आहे. आज यात्रेने बीडमधून कुच करतेवेळी शिवसेनेचे लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, जिल्हासंघटक नितीन धांडे, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, किसान सेनेचे जिल्हासंघटक परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, उपजिल्हाप्रमुख हनुमान पिंगळे, आशिष मस्के, सुशिल पिंगळे, सुनील अनभुले, दिलीप गोरे, तालुकाप्रमुख गोरख सिंघन, शहरप्रमुख सुनील सुरवसे, रतन गुजर, गणेश घुंबर्डे, लक्ष्मण बहिरवाळ, पंकज कुटे, सुनील गवते, गणेश मस्के, युवराज मस्के, किशोर गिराम, गणेश मस्के, गणेश जाधव, युवराज मस्के, पप्पू डावकर आदी उपस्थित होते.



























































