
तालुक्यातील नऊचारी संवत्सर येथील शेतकऱयाच्या वस्तीवर मध्यरात्री दरोडेखोरांनी सशस्त्र्ा दरोडा टाकला. घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत आणि लोखंडी गजाने मारहाण करून दरोडेखोरांनी नऊ तोळे सोने, रोकड असा पावणेतीन लाखांचा ऐवज लुटला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सात दरोडेखोर होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील नऊचारी संवत्सर येथे अनिल हरिभाऊ सोनवणे (वय 54) यांचे घर आहे. बुधवारी रात्री सोनवणे कुटुंबीय घरात झोपले होते. मध्यरात्री सात दरोडेखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी अनिल हरिभाऊ सोनवणे, सुनीता बबन सोनवणे (वय 52), सुगंधाबाई हरिभाऊ सोनवणे (वय 78) यांना दरोडेखोरांनी लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवत सोने आणि रोकड लुटली. मारहाणीत जखमी झालेल्या सोनवणे कुटुंबीयांवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे उपचार सुरू आहेत.
दरोडय़ाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पथकासह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी कविता अनिल सोनवणे (वय 50) यांनी कोपरगाव शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात सात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. कोपरगाव शहर पोलीस पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.





























































