लोअर परळ उड्डाणपुलासाठी चार दिवस मध्यरात्री ‘ट्रफिक ब्लॉक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धोकादायक ठरवून तीन वर्षांपूर्वी पाडलेल्या लोअर परळच्या डिलाईल पुलाचा दुसरा महाकाय 1040 मेट्रिक टनाचा गर्डर लाँच करण्यासाठी पश्चिम रेल्वे 15 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सलग चार दिवस चार तासांचे नाईट ट्रफिक ब्लॉक घेणार आहे. सुमारे 100 वर्षे हा जुना पूल 24 जुलै 2018 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढच्या वर्षापर्यंत रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्याचे टार्गेट असून त्यानंतर पालिका हद्दीतील काम केले जाणार आहे.

पश्चिम रेल्वेने 15 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून चार ब्लॉक घेण्याचे नियोजन केले असून आज 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीही 1.10 ते 17 सप्टेंबर रोजी पहाटे 5.10 पर्यंत ट्रफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे चर्चगेट येथून बोरिवलीला जाण्यासाठी मध्यरात्री 1 वाजता सोडण्यात येणारी शेवटची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर 17 सप्टेंबर रोजी पहाटे 4.04 वाजता अंधेरी येथून चर्चगेटला, तसेच पहाटे 3.50 वाजता बोरिवली येथून चर्चगेटला जाणारी पहिली लोकलही रद्द करण्यात आली आहे. चर्चगेटहून 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.31 वाजता अंधेरीला जाणारी, 17 सप्टेंबर रोजी पहाटे 4.19 वाजता चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी लोकल आणि पहाटे 5.31 वाजता बोरिवली येथून चर्चगेटला रवाना होणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.