
प्रत्येक वाहिनी ही प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार मालिकांची निर्मितीही करीत असते. सध्याचे स्पर्धात्मक युग आहे. त्यामुळे प्रत्येक वाहिनीवर काय चाललंय, विषय कुठला आहे आणि टीआरपी किती आहे, याचा मागोवा त्यांना घ्यावा लागतो. त्यामुळे त्याचा अभ्यास हा जाणीवपूर्वक त्यांना करावा लागतो. वाहिन्या जाहिरातीच्या उत्पन्नातून कोटय़वधींचा व्यवसाय करीत असतात. जाहिराती कमी झाल्या की समजावं, सादर होणारी मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे. वाहिनीचाच मालिका निर्मात्यांवर वरदहस्त असेल तर मालिका कितीही कंटाळवाणी होत असली तरी ती आपला गाशा गुंडाळत नाही. त्याची गणितं आणि त्याचा ल.सा.वि. आणि म.सा.वि. हा प्रत्येक वाहिनीवरचा प्रोग्रॅम हेड आणि त्यांचे सहकारी काढत असतात.
सध्या वाहिनीवर ज्या मालिका प्रसारित होत आहेत, त्यातील 70 टक्के या कौटुंबिक विषयावरच्या आहेत. जास्तकरून कुटुंबातील ‘आई’ या परिघाभोवती फिरताना दिसतात. काही सासू – सुनांच्या कथानकांवर बेतलेल्या दिसतात, तर काही पती – पत्नी यांच्या बाहेरख्याली प्रकरणावर असतात. मालिकांचे पहिले एपिसोड रंजकदार सादर होतात. ते काही विशिष्ट भागांपर्यंत ती रंजकता टिकून राहते. पटकथाकार आणि संवाद लेखक आपापसात चर्चा करून मालिकेच्या भागातील रंजकता वाढवीत असतात. मालिकेची पटकथा ही फार महत्त्वाची असते. वाहिनीवाल्यांच्या प्रोग्राम हेडवरसुद्धा ते अवलंबून असते असं म्हणतात.
हल्ली प्रत्येक वाहिनीवरून ज्या ज्या मालिका प्रसारित होताहेत त्यांच्या कथानकात व्यावहारिकपणा कितपत असतो हा एक संशोधनाचा विषय होईल. आता ‘आई’ हे आपण दैवत मानतो. मालिकेच्या कथानकातील आई ही नेहमी वेगळीच भासते. ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पूची आई डॉ. अंजली वर्तक आपल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करताना दिसते. जर ती अप्पूची सावत्र आई असती तर एकवेळ समजू शकतो, पण सख्खी आई अशी वागेल का? हा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडलेला आहे. तसाच प्रकार इतर मालिकेतसुद्धा दिसला. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अजून किती ट्विस्ट येणार आहेत याची यादीच वाहिनीने प्रसिद्ध करावी. म्हणजे आम्हाला मालिका संपणार कधी हे कळेल अशादेखील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यास मिळताहेत. एकूण काय तर प्रेक्षकांनी न पटणाऱया गोष्टी पाहायच्या हेच त्यातून स्पष्ट होतंय. वाहिनीवरचे प्रोग्राम हेड त्याकडे लक्ष का देत नाहीत? की त्यांनासुद्धा न पटणाऱया गोष्टी दाखवायच्या आहेत हे सुजाण प्रेक्षकांचं मतं पडलं. असंच जर चालणार असेल तर मालिका न पाहता सांगीतिक कार्यक्रम पाहिलेले बरे असा मतप्रवाह दिसून आला. प्रेक्षकांच्या पसंतीकडे वाहिनीवाले पाहणार आहेत की आपलाच ठेका चालू ठेवणार? शेवटी बॉल इन देअर कोर्ट.
संजय कुळकर्णी




























































