एफवाय बीएचे विद्यार्थी निकालच्या प्रतीक्षेत, आयडॉलच्या प्रवेशाची मुदत 30 सप्टेंबरला संपणार मात्र गुणपत्रिकाच नसल्याने प्रवेश घेता येत नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या (आयडॉल) जुलै सत्राच्या प्रवेशास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आजपर्यंत या सत्रात 27 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे आयडॉलने सांगितले असले तरी अनेक अभ्यासक्रमांच्या मागीत वर्षांच्या परीक्षांचा निकालच जाहीर न झाल्याने जुलै सत्रातील प्रवेश कसा घेणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. आयडॉलच्या एफवाय बीएची परीक्षा 5 ऑगस्टला संपली. मात्र आतापर्यंत निकालच जाहीर न झाल्याने या विद्यार्थ्यांचे एसबायबीएचे प्रवेश लटकले आहेत.

आयडॉलने जुलै सत्रातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रवेशाच्या या फेरीत बारावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेले एसएससी बोर्डाचे तसेच सीबीएससी  व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना तसेच ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही त्यांना प्रवेश घेता येणार आहे. मात्र अजूनही आयडॉलच्या काही अभ्यासक्रमाच्या आधीच्या वर्षांचे निकाल जाहीर न झाल्याने नियमित विद्यार्थीही प्रवेश घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल कधी लागणार याविषयी विद्यार्थी आयडॉलच्या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहेत, मात्र त्यांना निकालाविषयी कोणतीही माहिती मिळत नाही. तेथील कर्मचारी विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाण्यास सांगतात. एसवायसाठी प्रवेश घेण्यास एफवायची गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे. पण निकालच लागला नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहेत.