19 सप्टेंबर ही तारीख ना ‘स्टुअर्ट ब्रॉड’ विसरू शकतो ना ‘रोहित शर्मा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही क्रिकेटपटूच्या आयुष्यात काही दिवस हे फार महत्वाचे आणि कायम आठवणीत राहणारे असतात. एखादा दिवस एखाद्या क्रिकेटपटूसाठी दिवास्वप्नासारखा असतो तर दुसऱ्यासाठी तोच दिवस हा भयंकर, भीतीदायक घटनेसारखा असतो. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासाठी 19 सप्टेंबरचा दिवस कायम आठवणीत राहणारा आहे.

सुरुवात स्टुअर्ट ब्रॉडपासून करुया. याच महिन्यात ब्रॉडने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा पार केला. स्टुअर्ट ब्रॉड याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी लढतीत त्याने ही कामगिरी नोंदवली आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना, लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला होता. या कसोटीमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेम मॅकग्राथला मागे टाकत पाचव्या स्थानावर झेप घेतली. मात्र 19 सप्टेंबरचा दिवस हा ब्रॉडसाठी कायम आठवणीत राहणारा आणि एका भयंकर स्वप्नासारखा आहे. कारण 2007 साली याच दिवशी हिंदुस्थानी संघाचा तुफानी फलंदाज युवराज सिंग याने ब्रॉडला 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारले होते. हा दिवस त्याला आजही त्या सामन्याची आठवण करून देतात.

तर दुसरीकडे रोहित शर्मासाठी मात्र 19 सप्टेंबरचा दिवस अविस्मरणीय आहे. आजच्याच दिवशी 2007 साली रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पदार्पण केलं होतं. कू या देशी सोशल मीडिया अॅपवर स्टार स्पोर्टसने रोहित शर्माच्या पदार्पणाची आठवण करून देणारी पोस्ट शेअर केली आहे.

पदार्पणापासून आतापर्यंत रोहित शर्मा याने 136 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून यातील 128 डाव तो खेळला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 16 वेळा नाबाद खेळी करणाऱ्या रोहित शर्माने या फॉरमॅटमध्ये 32.32 च्या सरासरीने 3,620 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माने 4 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत. म्हणूनच क्रिकेट विश्वात त्याची ओळख हिट मॅन शर्मा अशी आहे.