
मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघायचं म्हटलं की, एका तिकिटासाठी साधारण 300 ते 400 रुपये मोजावे लागतात. मात्र, प्रेक्षकांना आता अवघ्या 75 रुपयांत मल्टीप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा बघता येणार आहे. 23 सप्टेंबर रोजी असलेल्या ‘नॅशनल सिनेमा डे’चे औचित्य साधून मल्टीप्लेक्स असोशिएशन ऑफ इंडिया आणि देशभरातील मल्टीप्लेक्स एकत्र आले असून त्यांनी सिनेप्रेमींसाठी ही खास ऑफर देऊ केली आहे. सुरुवातीला 16 सप्टेंबर रोजी नॅशनल सिनेमा डे साजरा करण्यात येणार होता. मात्र, ‘ब्रह्मास्त्र’च्या कलेक्शनवर या ऑफरचा परिणाम होऊ नये यासाठी मल्टीप्लेक्स असोसिएशनने ‘नॅशनल सिनेमा डे’ 16 ऐवजी 23 सप्टेंबरला साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलीस, कार्निव्हल, मिराज, सिटीप्राड, मुक्ता ए-2 अशा अनेक मल्टीप्लेक्स चैन या उपक्रमात सहभागी होतील.



























































