उत्पन्नावर आधारित रेशनकार्ड बंद करू नका, शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेशनचा अधिकार कायम ठेवावा. रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा दोन लाख करण्यात यावी. उत्पन्नावर आधारित रेशनकार्ड बंद करू नये, आदी प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ऐतिहासिक दसरा चौक येथून जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे आदी पदाधिकाऱयांसह शिवसैनिक आणि महिला उपस्थित होते.

महागाईचा वाढता आगडोंब, एक हजारहून अधिक रुपये झालेला गॅस आणि अन्नधान्यांवरील जीएसटी बंद करा, आदी समस्यांवरून शिवसेनेच्या पदाधिकाऱयांकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा कडाडून विरोध करण्यात आला. केशरी कार्डावर गहू, तांदूळ, डाळ देण्यात यावी. दसरा, दिवाळीला रेशनवर खाद्यतेल, डाळ, साखर द्यावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.