कोयना शंभर टक्के भरले, नदीपात्रात 10 हजार 513 क्युसेकने विसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणात बुधवारी दुपारी 105.25 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याने धरण आता पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरले आहे. धरणात येणाऱया पाण्याची आवक व संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता धरणाचे सहा वक्री दरवाजे बुधवारी दुपारी पुन्हा एक फुटाने वर उचलून त्यातून नऊ हजार 463 व पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1050 असे 10 हजार 513 क्युसेकने पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने बहुतांशी ठिकाणी उघडीप दिली असली तरी अंतर्गत नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सरासरी सहा हजार 402 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता पूर्ण क्षमतेचा 105.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यापुढे पाणी सामावून घेण्याची क्षमता पूर्णपणे संपुष्टात आल्याने पुन्हा धरणाच्या सहा वक्री दरवाजातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. 1 जूनपासून आतापर्यंत कोयना येथे 4435 मिलिमीटर, नवजा 5391 मिलिमीटर व महाबळेश्वर येथे 5799 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणाची सध्याची स्थिती

– उपलब्ध पाणीसाठा 105.25 टीएमसी. उपयुक्त पाणीसाठा 100.25 टीएमसी. पाणी उंची 2163.6 फूट. जलपातळी 659.435 मीटर. आवक 6 हजार 402 क्युसेक.

महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरणात बुधवारी दुपारी पूर्ण क्षमतेने म्हणजेच 105.25 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर धरण काठोकाठ भरल्याचे भिंतीच्या आतील बाजूने टिपलेल्या छायाचित्रात दिसत असून, धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. (छाया : वैभव देशमुख)