पश्चिमरंग – हंस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंत पाटील

पाश्चात्य विश्वात कॅमी सें सेंस नावाचा एक महान संगीतकार होऊन गेला, ज्यानं जन्मभर गंभीर प्रकारात मोडणाऱ्या संगीतरचना केल्या. त्याच्या मृत्यूनंतर एका वर्षानंतर हा संग्रह प्रकाशित झाला आणि त्यानंतर हा संग्रह त्या संगीतकाराच्या सर्वोत्कृष्ट रचनांमध्ये गणला जाऊ लागला. त्यातीलच एक रचना म्हणजे ‘हंस’.

एखादी व्यक्ती आपली गंभीर प्रतिमा जपण्यासाठी कुठपर्यंत जाऊ शकते? पाश्चात्य विश्वात एक महान संगीतकार होऊन गेला, ज्यानं जन्मभर गंभीर प्रकारात मोडणाऱ्या संगीतरचना केल्या. त्यानं संगीताच्या एका अपयशी दौऱ्यानंतर विरंगुळा म्हणून काही गमतीदार रचना केल्या, पण त्यानं त्या कधी प्रकाशित होऊ दिल्या नाहीत. कारण त्याच्या ‘गंभीर’ असणाऱ्या प्रतिमेला या रचनांनी तडा जाईल असं त्याला वाटायचं!! तो जिवंत असेपर्यंत हा गमतीदार रचनासंग्रह कधीच प्रकाशित झाला नाही.

त्याच्या मृत्यूनंतर एका वर्षानंतर हा संग्रह प्रकाशित झाला आणि त्यानंतर हा संग्रह त्या संगीतकाराच्या सर्वोत्कृष्ट रचनांमध्ये गणला जाऊ लागला. या रचनासंग्रहात एकूण 14 रचना होत्या. त्यापैकी एक रचना अजूनही पाश्चात्य संगीताच्या इतिहासामध्ये सर्वात लोकप्रिय रचनांच्या यादीमध्ये न चुकता येते!!

फ्रेंच संगीतरचनाकार कॅमी सें सेंस 1885 मध्ये आपलं संगीत सादर करण्यासाठी जर्मनीच्या दौऱयावर गेला होता. या काळात त्यानं जर्मन संगीतकार वॅग्नर याच्यावर कडव्या शब्दांमध्ये टीका केली होती! वॅग्नर हा जर्मन लोकांचा लाडका संगीतरचनाकार होता. त्याच्यावर फ्रेंच संगीतकारानं केलेली टीका जर्मन लोकांना पचनी पडत नव्हती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला – जर्मन लोकांनी कॅमी सें सेंसच्या कार्यक्रमावर एक प्रकारे बहिष्कारच टाकला. लोकांनी त्याच्या कार्यक्रमांविरुद्ध सरळ सरळ निदर्शनेच केलीत!!

या साऱया प्रकारचा कॅमी सें सेंसला बराच मनस्ताप झाला. डोक्याला थोडी शांती मिळावी म्हणून तो काही काळासाठी ऑस्ट्रियामध्ये शहरापासून दूर अशा निसर्गरम्य ठिकाणी राहायला गेला. इथं त्यानं त्याच्या तिसऱया सिम्फनीच्या गंभीर रचनेवर काम करणं अपेक्षित होतं, पण त्याचं मन लागत नव्हतं. त्याला आयुष्यात गंभीर गोष्टींपासून विश्रांती हवी होती. याच ठिकाणी त्यानं एक गमतीदार संगीत रचनांचा संग्रह लिहायला सुरुवात केली!

या गमतीदार रचनासंग्रहाचं नाव होतं ‘प्राण्यांची जत्रा’ (Carnival of Animals). यात चौदा छोटय़ा छोटय़ा रचना होत्या. बहुतेक साऱ्या रचना एक किंवा दोन मिनिटांच्याच होत्या. साऱ्या रचना वाजवायला अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ लागायचा. यातल्या बहुतेक साऱया रचना एकेक प्राण्यावर केल्या होत्या. या चौदा रचनांपैकी तेरावी रचना होती ‘हंस’ (The Swan). हयात असताना या संगीतकारानं फक्त ही एकच रचना प्रकाशित होऊ देण्यास परवानगी दिली. संगीताच्या इतिहासात पुढं ही रचना अजरामर झाली!

‘हंस’ ही रचना काहीशी गंभीर चाल असणारी होती. त्यामुळं कॅमी  सें सेंसनं ही रचना प्रकाशित करण्यास नकार दिला नाही. व्हायोलिनसारखंच दिसणारं, पण व्हायोलिनपेक्षा आकारानं मोठं असणारं आणि खोल आवाज असणारं वाद्य ‘चेलो’ या रचनेसाठी संगीतकारानं निवडलं होतं. चेलोवर मुख्य मेलडी वाजताना या रचनेत साथ देण्यासाठी दोन पियानो येत होते. चेलोच्या खोल आवाजामुळं ही घनगंभीर मेलडी अजूनच परिणामकारक होत होती.

हंसाविषयी एक पौराणिक कल्पना पाश्चात्य समाजात आहे. या कल्पनेप्रमाणं हंस आपलं बहुतेक सारं आयुष्य शांततेत व्यतीत करतो आणि आयुष्याच्या शेवटी (मरणापूर्वी) अतिशय सुंदर गीत गातो. काहींच्या मते संगीतकारानं ‘हंस’ या रचनेत हेच सुंदर गीत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. ‘हंस’ या रचनेचं संगीत आजपर्यंत कित्येक वेळा हॉलीवूडमधल्या चित्रपटांमध्ये वापरण्यात आलंय, कित्येक वेळा रेकॉर्ड करण्यात आलंय.

या रचनासंग्रहात हंसाशिवाय सिंह, हत्ती, कांगारू, कासव अशा तऱ्हेतऱ्हेच्या प्राण्यांवर संगीतरचना येत होत्या. यातली आजही लोकप्रिय असणारी अजून एक रचना म्हणजे अॅक्वारियम. मंदपणे प्रकाशित असणाऱया पाण्यात विहार करणाऱया माशांचा अनुभव एक प्रकारे या रचनेत येतो.

एखादी साधी चाल किती सुंदर असू शकते, चेलोवरचे स्वर मनाचा ठाव कसा घेऊ शकतात याचा अनुभव घेण्यासाठी Saint-Saens यांची The Swan ही रचना आपण यूटय़ूबवर आवर्जून पाहायलाच हवी!

[email protected]