करीअरचं नवं वळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश आचवल

सध्या प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटक 30 वर्षांनंतर पुन्हा नव्या संचात आपल्यासमोर आलं आहे. यामध्ये ‘वीरेन’ ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे पार्थ केतकर. एक प्रॉमिसिंग चेहरा.

पार्थ मुळात पुण्याचा आहे. पार्थ जेव्हा चार वर्षांचा होता, तेव्हा त्याने ‘अवंतिका’ मालिकेत ‘तेजस’ची भूमिका केली होती. त्यानंतर ‘पेशवाई मध्ये सुद्धा त्याची भूमिका होती. मग पिंपळपान, रेशीमगाठी अशा अनेक मालिकांत त्याने बालकलाकार म्हणून काम केले. पुण्यामधील ‘प्रेरणा एक कला मंच’ या संस्थतर्फे तो राज्य नाटय़ स्पर्धेत काम करू लागला. बीएमसीसी कॉलेजला असताना पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडकमध्ये सुद्धा तो सहभागी होता. त्याचे वडील प्रसन्न केतकर हे प्रसिद्ध अभिनेते आहेत, तर आई ही हॅन्ड पपेट्री कला सादर करते. त्याने झी फाईव्हवरील ‘गोंद्या आला रे’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका केली. ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटात आणि ‘जिजामाता’ या मालिकेतदेखील त्याची भूमिका होती. ‘माईज स्पेशल’ या चित्रपटाचे शूटिंग चालू असताना त्याला त्याच्या मित्राकडून ‘चारचौघी’ नाटकाबद्दल कळलं आणि ऑडिशन देण्यासाठी तो मुंबईत आला. पार्थ म्हणतो, मी ऑडिशन दिली, पण 15 ऑगस्टपर्यंत मला काहीच कळलं नव्हतं. मी मनातून खूप अस्वस्थ होतो आणि अचानक मला फोन आला आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितलं की, आपण उद्यापासून तालमींना सुरुवात करतोय, मुंबईला ये. माझ्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट होता. मला तालमीच्या प्रोसेसमधून खूप काही शिकता आलं. ‘चारचौघी’मधील ‘वीरेन’ ही खूप आनंदी व्यक्तिरेखा आहे. एका प्रसंगात तर मला लाईव्ह गीत सादर करायचे आहे. ते गीत गाताना खूप आनंद मिळतो.’

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या आगामी चित्रपटात पार्थची महत्त्वाची भूमिका आहे. ‘चारचौघी’मधील वीरेन ही व्यक्तिरेखा त्याच्यासाठी नवीन वळण घेऊन आली आहे.