स्मार्टवॉच वापरून मोबाईल चोराचा पाठलाग केला, सापडल्यावर चोराला धू-धू धुतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेहमीच्या घड्याळाच्या जागी हल्ली स्मार्ट वॉच वापरण्याचा ट्रेंड आहे. अशाच स्मार्टवॉचच्या माध्यमातून एका तरुणीने मोबाईल चोराला चांगलीच अद्दल घडवली आहे.

ही घटना दिल्ली येथे घडली आहे. दिल्लीच्या पालम विहारची रहिवासी असलेली पल्लवी कौशिक ही तरुणी एका खासगी कंपनीत उच्च पदावर काम करते. घटनेच्या दिवशी ती सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाजारहाट करण्यासाठी गेली होती. तिथे तिच्या मागे उभ्या असणाऱ्या एका इसमाने तिचा फोन खेचला आणि तिथून पळ काढला.

पल्लवीने आरडाओरडा करूनही कुणीही तिच्या मदतीला पुढे आलं नाही. तेव्हा तिनेच त्याचा पाठलाग करायचा निर्णय घेतला. ती त्याच्या मागे सुमारे 200 मीटर पळाली. पण, तो चोर तिला चकवून पसार झाला. तिने तिच्या स्मार्टवॉचवरून त्याचा माग काढायचा प्रयत्न केला. जवळपास तीन तासांनी त्या फोनचं लोकेशन ट्रॅक करण्यात तिला यश आलं.

तो फोन तिच्या रहिवासी संकुलाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका रस्त्यावर असल्याचं तिला दिसलं. त्याचा माग काढताना तिला तो चोर एका मोटरसायकवर बसून तिचा फोन वापरत असल्याचं दिसलं. पल्लवीने त्याला चाहूल लागू न देता गाठलं आणि त्याच्या डोक्यावर प्रहार केला. तो चोर खाली पडला. पल्लवीने त्याची धुलाई करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने तो चोर बिथरला आणि तिचा फोन टाकून पळून गेला.

या तीन तासात त्या चोराने तिचा यूपीआय पीन वापरत खात्यातून 50 हजार अन्य खात्यांवर पाठवले होते. या प्रकरणी पल्लवीने पोलिसात तक्रार केली असून या चोराचा शोध घेण्यात येत आहे.