आशियाचा स्थापत्य वारसा – शिल्पसमृद्ध बांटे श्राय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

बांटे श्राय हे मंदिर त्याच्या शिल्पसमृद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय बारीक कोरीवकाम, त्यामध्ये दाखवलेली देवदेवतांची शिल्पे, काही गोष्टी सांगणारी कथनशिल्पे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या दगडात हे मंदिर बांधले तो लाल रंगाचा वालुकाश्म दगड यासाठी हे मंदिर वैशिष्टय़पूर्ण ठरते.

त्रिभुवनमहेश्वर हे मूळ नाव असलेल्या आणि आज ‘बांटे श्राय’ (म्हणजे ‘सुंदर स्त्रियांचा किल्ला किंवा तटबंदीयुक्त स्थापत्य’ – Citadel of beautiful women) या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची उभारणी यज्ञवराह याने केली होती हे आपण मागच्या लेखात पहिले. कंबोडियातील मंदिर स्थापत्याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे अतिशय प्रचंड आकाराची मंदिरे, पण त्यामध्ये जे काही उल्लेखनीय अपवाद आहेत, त्यामध्ये या मंदिराचे स्थान खूप वरचे आहे. इ.स. 967 मध्ये बांधलेल्या मंदिराचे अजून एक वैशिष्टय़ आहे आणि ते म्हणजे अतिशय बारीक कोरीवकाम, त्यामध्ये दाखवलेली देवदेवतांची शिल्पे, काही गोष्टी सांगणारी कथनशिल्पे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या दगडात हे मंदिर बांधले तो लाल रंगाचा वालुकाश्म दगड. या सर्व गोष्टींचा मनोहारी परिणाम प्रेक्षकांवर होतो.

स्थापत्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे मंदिर जरी छोटेखानी असले तरी त्याचा परिसर विस्तीर्ण आहे. एकात एक तीन भिंतींच्या किंवा तटबंदीच्या आत हे मंदिर पाहायला मिळते. या आवारात प्रत्येक भिंत पार करताना एक गोपुर, मोठमोठे व्हरांडे, ग्रंथालय म्हणून ओळखले गेले त्या इमारती, मंडप, मुख्य मंदिर आणि मोठय़ा संख्येने मूर्ती आढळतात. या मंदिराच्या प्राकाराचे बांधकाम पूर्व – पश्चिम दिशांप्रमाणे केले आहे. परिसरात प्रवेश करताना तो पूर्व दिशेकडून करावा लागतो. जांभ्या दगडात बांधलेल्या एका लांब पदपथावरून चालत चालत दोन तटबंदींची गोपुरे पार करून आत जावे लागते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. या परिसरातील बांधकामात विटा, लाल वालुकाश्म आणि जांभ्या दगडाचा वापर केलेला दिसतो, पण शिल्पांसाठी मात्र लाल वालुकाश्म दगडाचा वापर केला होता. कोरण्यासाठी थोडा मऊ दगड हवा असल्यामुळे या दगडाची निवड केलेली दिसते.

इथे इमारतींच्या दर्शनी भागावरच त्रिकोणी भाग हा विशेषतः शिल्पांसाठी वापरला गेलेला दिसतो. इमारतींच्या बाह्य भिंतींवर अप्सरा, देवी, द्वारपालाची मोठय़ा आकाराची शिल्पं आहेतच, पण या त्रिकोणी भागात तर सुबक, सविस्तर, भरपूर व्यक्तिमत्त्वे दाखवलेले पौराणिक किंवा रामायण, महाभारत या ग्रंथांतले विविध प्रसंग शिल्पकारांनी अतिशय कौशल्याने कोरलेले दिसतात. यामध्ये आपल्या सोंडेमध्ये पाण्याचे घडे भरून देवीवर अभिषेक करणारे हत्ती हे शिल्प फारच उल्लेखनीय आहे. गजलक्ष्मी या प्रतीकाचे महत्त्व जितके हिंदुस्थानात होते, तितकेच ते पंबोडिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही होते. त्यामुळे नवनिर्मिती आणि समृद्धीचे सूचक असलेले हे शिल्प मंदिराच्या बाहेरील बाजूस पाहायला मिळते.

याव्यतिरिक्त इथे रावणानुग्रह हे शिल्पही आहे. हिंदुस्थानातील मंदिरांमध्ये मोठय़ा संख्येने आढळणारे हे शिल्प शिवाने रावणाचे गर्वहरण कसे केले हे दाखवते. रावण शिवभक्त असल्यामुळे जेव्हा त्याला शिवाच्या द्वारपालांनी शिवाच्या दर्शनाला जाण्यास मनाई केली तेव्हा त्याने चिडून संपूर्ण पैलास पर्वत हलवायला सुरुवात केली. दहा राक्षसी तोंडांचा आणि वीस हातांचा रावण विकट हास्य करत पैलास पर्वत हलवताना दाखवला आहे. त्याच्या चेहऱयावरून त्याचा उद्दामपणा स्पष्टपणे दिसून येतो. तीन स्तरांमध्ये पैलास पर्वत दाखवला आहे. सर्वात वर शिव आणि त्याच्या मांडीवर पार्वती घाबरलेली आणि त्याला चिकटून बसलेली दिसते. शिवाच्या आसपास अनेक साधू, विविध प्राण्यांचे चेहरे असलेले गणही दाखवले आहेत. त्यामध्ये एक गणपतीही आहे. ते सगळे हात जोडून शिवाची प्रार्थना करत आहेत असे दाखवले आहे. खालचे दोन स्तर भरून रावणाची भव्य आकृती दिसते, ज्यामधून त्याची शक्ती प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिलेली आहे. पैलास पर्वत जेव्हा हलायला सुरुवात होते तेव्हा सर्व स्तरांवरचे रहिवासी घाबरून इकडे तिकडे पळायला लागतात. सर्वात खालच्या स्तरावरचे सिंह, वाघ, हत्ती, घोडे असे जंगलातील प्राणीही घाबरून सैरावैरा पळताना दाखवले आहेत, पण शिव मात्र शांत आहे आणि तो त्याच्या उजव्या पायाच्या अंगठय़ाने जमिनीवर दाब देताना दाखवला आहे. त्यामुळे रावणाचा शक्तिपात होतो आणि त्याच्या गर्वाचेही हरण होते. अतिशय नाटय़पूर्ण घटनेचे तितकेच सविस्तर आणि जिवंत चित्रण या शिल्पात पाहायला मिळते. याशिवाय शिवाचे नृत्य करतानाचेही एक देखणे शिल्प अशा प्रकारच्या त्रिकोणात कोरलेले दिसते.

रामायण आणि महाभारत या ग्रंथांमधलेही काही प्रसंग इथे पाहायला मिळतात. वाली आणि सुग्रीवाचे युद्ध दाखवणाऱया शिल्पात राम मागून लपून बाण मारतोय असे दिसते, पण वाली आणि सुग्रीव यांच्या चेहऱयावरचे भाव, त्यांच्या पायांची हालचाल, खाली घाबरून बसलेल्या इतर अस्वलांचे पाय आणि या लढणाऱया वाली आणि सुग्रीवांचे पाय हे एकमेकांच्या समोर, मागेपुढे कोरून या शिल्पात कलाकाराने आपले कसब अतिशय उत्तम रीतीने दाखवले आहे.

‘बांटे श्राय’ या मंदिरातील इतर भागांवर अजूनही काही उत्तम शिल्पे कोरलेली आहेत, ज्यामध्ये शिवाच्या तामीळनाडूतील नायनमार या भक्तांमधील करैकाल अम्मैयार हिचे शिल्प, कामदहन, नरसिंहाकडून हिरण्यकश्यपूचा नाश तसेच अतिशय देखण्या अप्सरा किंवा स्वर्गीय देवता, हातात भाला घेतलेले सुबक द्वारपाल आणि अतिशय सुरेख वेलबुट्टी, पाने, फुले यांचे शिल्पांकन यांचा समावेश होतो. जी कथनशिल्पे त्रिकोणात कोरली आहेत, त्या सर्वांच्या भोवती मकर तोरणाची नक्षीदार बाह्यरेखा आहे. काळाच्या ओघात मंदिराचा काही भाग पडला, तेव्हा इथल्या पडलेल्या शिल्पांना फ्रान्समधील गिमे येथील संग्रहालयात नेऊन ठेवले. तिथे पडलेल्या दगडांमधूनच मंदिराच्या काही भागांची पुनर्बांधणी झाली आहे.

इथली शिल्पे इतकी देखणी आहेत की, शिल्पांच्या तस्करांना त्यांचा मोह पडला नसता तरच नवल होते. 1923 साली आंद्रे मारलो नावाच्या एका तस्कराने इथल्या अप्सरांच्या काही मूर्ती चोरायचा प्रयत्न केला, पण तो पकडला गेला आणि त्या परत सरकारच्या ताब्यात आणल्या गेल्या. असा प्रयत्न परत होऊ नये म्हणून काही सुटय़ा शिल्पांच्या प्रतिकृती मंदिर परिसरात बसवून मूळ शिल्पे संग्रहालयात ठेवली, पण काही तस्करांनी प्रतिकृती चोरायचाही प्रयत्न केला. अशा प्रकारे या मंदिराचे सौंदर्य देशोदेशीच्या प्रवाशांना तर भुरळ घालतेच, पण आंतरराष्ट्रीय तस्करांनाही आकर्षित करते. आता सरकारने यासाठी कडक उपाययोजना केली आहे. सुंदर गुलाबी कमळे असलेल्या तलावाच्या काठावरील या मंदिराचे सौंदर्य सर्वच ऋतूंमध्ये खुलून दिसते आणि इथल्या प्रवाशांना एका वेगळ्याच दैवी वातावरणात घेऊन जाते.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
[email protected]