RJD Meeting आरजेडीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ, थेट लालूप्रसाद यादव यांच्या मुलालाच शिवीगाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे दिल्लीत अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये मोठा गदारोळ झाला असून लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री तेजप्रताप यादव यांच्या बहिणीला शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) रागारागाने बैठक सोडून निघून गेले. आरजेडी नेते श्याम रजक (Shyam Rajak) यांनी बहिणीला शिवीगाळ केल्याचा आरोप तेजप्रताप यांनी केला. तसेच श्याम रजक हे आरएसएसचे एजंट असल्याचेही ते म्हणाले.

बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव हे दिल्लीतील बैठकीला उपस्थित होते. मात्र काही वेळाने ते बैठक सोडून रागारागाने बाहेर आले. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते श्याम रजक यांच्यावर मोठा आरोप केला. श्याम रजक यांनी माझ्या बहिणीला शिव्या दिल्या. माझ्याकडे त्याचा ऑडिओ आहे. मी हा ऑडिओ माझ्या सोशल मीडिया पेजवरून शेअर करेन, असे तेजप्रताप म्हणाले.

श्याम रजक यांना कार्यक्रमाबाबत विचारले असता त्यांनी अश्लील शिवीगाळ केली. माझ्या बहिणीला आणि खासगी सचिवालाही शिव्या दिल्या. आम्ही त्याचा ऑडिओ बिहारच्या लोकांना ऐकवू. श्याम रजक हे आरएसएस आणि भाजपचे एजंट आहेत, असा आरोपही तेजप्रताप यांनी केला. अशा भाजप-आरएसएसच्या लोकांना संघटनेतून हाकलून द्यायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणावर श्याम रजक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मला या विषयावर भाष्य करण्याची गरज नाही. तेजप्रताप यांना जे म्हणायचे आहे ते बोलत आहेत. तो सामर्थ्यवान आहे आणि मी एक दलित व्यक्ती आहे. याशिवाय मी काहीही बोलू शकत नाही, असे श्याम रजक म्हणाले.